अवैध सागवान-बिजा चिरान प्रकरण : आरोपींना 10 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३१ : तालुक्यातील मेंढा गावालगत अवैधरित्या सागवान व बिजा लाकडाची कटाई व चिरान केल्याप्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 10 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वनविभागाच्या पथकाने 26 मार्च रोजी गस्ती दरम्यान संतोष देवराव तोफा यांच्या शेतात अवैध चिरान सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी चिन्नु रैनु दुगा, कालीदास बिहु आतला व संतोष देवराव तोफा (सर्व रा. मेंढा, ता. धानोरा) यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा नोंदवून 28 मार्च रोजी आरोपींना अटक करण्यात आली. प्रारंभी त्यांना 30 मार्चपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता 10 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली.
कारवाईदरम्यान 19 सागवान व 2 बिजा अशा एकूण 21 नग मौल्यवान लाकडाचा साठा जप्त करण्यात आला. हे लाकूड सामूहिक वनहक्क प्राप्त गावालगतच्या जंगलातून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून सुरू असून इतर काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने नागरिकांना अवैध वृक्षतोडीपासून दूर राहण्याचे तसेच अशा प्रकारांची माहिती तात्काळ देण्याचे आवाहन केले आहे.














