रांगी पी.एम श्री शाळेचा यशस्वी झेंडा ; तीन विद्यार्थ्यांची एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलसाठी निवड
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २७ : धानोरा तालुक्यातील रांगी येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेने पुन्हा एकदा गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमधील इयत्ता ६ वी ते ९ वीच्या रिक्त जागांसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
अनुसूचित जमाती व आदिम जमातीतील विद्यार्थ्यांसाठी १ मार्च २०२६ रोजी घेण्यात आलेल्या या प्रवेश परीक्षेत कुमारी गीत प्रदीप गेडाम, कुमारी रोशनी निलेश आहा आणि साहिल रुपेश पदा या विद्यार्थ्यांनी यश मिळवत एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलसाठी निवड निश्चित केली आहे.
या यशामुळे रांगी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी घेतलेले परिश्रम आणि मार्गदर्शन पुन्हा अधोरेखित झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून, भविष्यात अशाच यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













