बांबू तोडीसाठी खामतळा ग्रामसभेचा इशारा : ३ दिवसांत निर्णय न झाल्यास उपोषण
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा , दि. २५ : तालुक्यातील खामतळा ग्रामसभेने हक्काच्या रोजगारासाठी वन विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेत, बांबू तोडीची परवानगी देण्याबाबत ३ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. निर्धारित मुदतीत सकारात्मक निर्णय न झाल्यास गावातील सर्व नागरिक सामूहिक उपोषणाला बसतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२५-२६ च्या वर्किंग प्लॅननुसार कक्ष क्रमांक ३६५ व ३६६ हे बांबू तोडीसाठी उपलब्ध आहेत. खामतळा ग्रामसभेची सुमारे ६५० लोकसंख्या (२५० कुटुंबे) असून रोजगाराचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध नाही. असे असतानाही वन विभागाने कक्ष क्रमांक ३६५ मधील बांबू तोडीची परवानगी नाकारल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याउलट, केवळ ४० लोकसंख्या व ७ घरे असलेल्या कुमडपार ग्रामसभेला दोन्ही कक्षांमध्ये बांबू तोडीची परवानगी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याने खामतळा ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मोठ्या ग्रामसभेला डावलून छोट्या ग्रामसभेला प्राधान्य देणे हा अन्यायकारक निर्णय असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बांबू तोडीवरच अवलंबून असलेल्या खामतळा ग्रामसभेतील शेकडो नागरिकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असून, तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
२५ मार्च रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव घेऊन, ३ दिवसांच्या आत कक्ष क्रमांक ३६५ मध्ये बांबू तोडीची परवानगी देण्यात यावी, अन्यथा सर्व महिला, पुरुष व ग्रामस्थ सामूहिक उपोषणाला बसतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे. आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदनावर ग्रामसभेचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असून, आता वन विभाग या प्रकरणावर काय निर्णय घेतो, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.














