गॅस टंचाईचा फटका ; सरपण गोळा करताना वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

57

गॅस टंचाईचा फटका ; सरपण गोळा करताना वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
The गडविश्व
ता.प्र / नागभीड, दि. २५ : तालुक्यातील तळोधी परिसरात गॅस टंचाईमुळे जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना आज (२५) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रेमिला वाटघुरे (वय ४५, रा. सावरला) असे मृत महिलेचे नाव असून त्या सकाळी चुलीसाठी सरपण आणण्यासाठी इतर महिलांसोबत जंगलात गेल्या होत्या. तळोधी बालापूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ८९ मधील झुडपी जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करत त्यांना ठार केले.
घटनेवेळी सोबत असलेल्या महिलांनी आरडाओरड करून ग्रामस्थ व वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाघाने मृतदेह सुमारे १५० मीटर अंतरावर तलावाजवळील झुडपात ओढून नेल्याचे आढळून आले.
तळोधी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह नागभीड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. वनविभागाकडून पीडित कुटुंबाला तात्काळ मदत देण्यात आल्याची माहिती असून उर्वरित नुकसानभरपाई लवकर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
दरम्यान, तळोधी परिसरात स्वयंपाक गॅसची तीव्र टंचाई असल्याने महिलांना जंगलात जाऊन सरपण गोळा करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
घटनेनंतर वनविभागाने परिसरात १० ट्रॅप कॅमेरे व २ लाईव्ह कॅमेरे बसवून वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरा जंगलात जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #TigerAttack #Chandrapur #Nagbhid #GasShortage #FirewoodCollection #ForestTragedy #WildlifeConflict #BreakingNews #MaharashtraNews #RuralCrisis

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here