बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा उघड ; महसूल विभागातील ७ अधिकाऱ्यांवर धडक कारवाई
– ४ जण बडतर्फ, ३ निलंबित
The गडविश्व
भंडारा, दि.२४ : दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत प्रवेश मिळवणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील महसूल विभागातील सात अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. यात चार अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर महसूल विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची नागपूर वैद्यकीय मंडळाकडून करण्यात आलेल्या पुनर्तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. तपासणीत काही अधिकाऱ्यांनी दिव्यांगत्वाचे प्रमाण जास्त दाखवले, तर काहींनी पूर्णतः बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाने तब्बल २२२ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी केली. या व्यापक चौकशीत अनेक अनियमितता समोर आल्याने पुढील कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिव्यांग व्यक्तींचे हक्क सुधारणा नियम २०१६ अंतर्गत जिल्हा विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच समाज कल्याण व कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या समितीच्या तपासणीतच हा प्रकार उघड झाला. प्रशासनाच्या या धडक कारवाईनंतर बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्यात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #bhandaranews














