गडचिरोलीत ११ वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण
-माओवादी चळवळीला मोठा धक्का
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : जिल्ह्यातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून, डिव्हीसीएम, एरिया कमिटी सचिव, पीपीसीएम, कमांडर व एसीएम अशा वरिष्ठ पदांवरील माओवाद्यांसह एकूण 11 जहाल माओवाद्यांनी आज गडचिरोली पोलीस दल व केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) समोर आत्मसमर्पण केले. या सर्वांवर एकत्रितपणे 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
गडचिरोली जिल्ह्यात एकेकाळी 10 उपविभागांत सक्रिय असलेली माओवादी चळवळ आता जवळजवळ संपुष्टात येत असून ती सध्या केवळ भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहिली आहे. शासनाच्या आत्मसमर्पण धोरणाला मिळत असलेला प्रतिसाद आणि पोलीस व CRPF यांच्या सातत्यपूर्ण संयुक्त कारवाईमुळे माओवादी संघटनेची पकड दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
आत्मसमर्पित माओवाद्यांमध्ये सोनी ऊर्फ बाली वत्ते मट्टामी (डिव्हीसीएम- कुतुल दलम) वय 45 वर्षे, रा. बालेवाडा, ता. कोहकामेटा, जि. नारायणपूर (छ.ग.), बुदरी ऊर्फ रामबत्ती आयतु मट्टामी (एरीया कमिटी सचिव – इंद्रावती एरीया कमिटी), वय 40 वर्षे, रा. बोडगा, ता. व जि. बीजापूर (छ.ग.), सुखलाल बोळगा कोक्सा (कमांडर – पश्चिम ब्युरो सप्लाय टीम), वय 31 वर्षे, रा. काकुर, ता. कोहकामेट्टा, जि. नारायणपूर (छ.ग.), शांती ऊर्फ सोमरी गंगा तेलामी (पिपीसीएम – पश्चिम ब्युरो सप्लाय टीम), वय 28 वर्षे, रा. नागाराम, ता. कोंटा, जि. सुकमा (छ.ग.), यमुनक्का ऊर्फ रुखमाक्का पोट्टी पेंदाम (एसीएम – भामरागड दलम), वय 60 वर्षे, रा. गुड्डीगुडम (पोस्टे राजाराम खां), ता. अहेरी, जि. गडचिरोली, गणेश उलगे कोवासी (सदस्य – कंपनी क्र. 10), वय 21 वर्षे, रा. हिक्केर (पोस्टे गर्देवाडा), ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, मिनको ऊर्फ जमनी काया मट्टामी (सदस्य – कंपनी क्र. 10), वय 22 वर्षे रा. मुस्पर्शी (पोस्टे बांधे), ता. पखांजूर, जि. कांकेर (छ.ग.), धनु दसरु वेळंजे (सदस्य – कंपनी क्र. 10), वय 38 वर्षे, रा. ताडगाव, ता. भामरागड, जि. गडचिरोली, सुनिता ऊर्फ वंगे वत्ते होयाम (सदस्य – सँड्रा दलम), वय 25 वर्षे, रा. वेलगंड्रा (पोस्टे परसेगड), तह. व जि. बीजापूर (छ.ग.), रमेश पांडू मडावी (सदस्य – मोबाईल पोलीटीकल स्कुल), वय 28 वर्ष, रा. गोगागुडा, तह. व जि. सुकमा (छ.ग.), किशोर सुक्रैय्या वासम (मिलिशीय कमांडर – सँड्रा दलम), वय 33 वर्षे, रा. सँड्रा (पोस्टे परसेगड), ता. भोपालपट्टनम्, जि. बिजापूर (छ.ग.) यांचा समावेश आहे.
यातील काही माओवादी गेल्या दोन ते चार दशकांपासून संघटनेत सक्रिय होते, तर काहींवर गडचिरोली जिल्ह्यात चकमकींसह गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. इतर राज्यांतील गुन्ह्यांची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विशेष म्हणजे, 15 ऑक्टोबर 2025 रोजी पोलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भूपती (सोनू) याच्यासह 61 माओवाद्यांनी 54 शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्यानंतर माओवादी चळवळीला मोठा फटका बसला होता. त्यानंतर देशभरात 897 माओवाद्यांनी 545 शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्याची नोंद आहे. गडचिरोली जिल्ह्यात सन 2005 पासून आतापर्यंत एकूण 794 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सन 2022 पासून आतापर्यंत 157 जहाल माओवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली असून, त्यापैकी सन 2025 पासून आजपर्यंत 123 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन बक्षीस जाहीर करण्यात आले. पती पत्नी असलेले माओवादी सदस्य ( सुखलाल बोळगा कोक्सा व त्याची पत्नी शांती ऊर्फप सोमरी गंगा तेलामी व गणेश उलगे कोवासी व त्याची पत्नी मिनको ऊर्फ जमनी काया मट्टामी) यांनी आत्मसमर्पण केल्याने त्यांना एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून 1.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. तसेच गटाने आत्मसमर्पण केल्यामुळे 10 लाख रुपयांची बक्षीस जाहीर केले आहे.
या प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील यांनी उर्वरित माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले. सन्मानाने जीवन जगण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास पोलीस व CRPF चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













