गडचिरोली : सचिनच्या हत्याराच्या पोलिसांनी २४ तासात आवळल्या मुसक्या

3

गडचिरोली : सचिनच्या हत्याराच्या पोलिसांनी २४ तासात आवळल्या मुसक्या
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : शहरातील लांझेडा परिसरात पैशाच्या जुन्या वादातून १६ मार्च रोजी घडलेल्या सचिन कोल्हुरवार हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली असताना, गडचिरोली पोलिसांनी वेगवान कारवाई करत अवघ्या २४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळत प्रकरणाचा उलगडा केला आहे.
विवेकानंद नगर येथील रहिवासी सचिन कोल्हुरवार (वय ३५) याने सुमारे सहा वर्षांपूर्वी आरोपी महेश बुरांडे याला फर्निचर बनवण्यासाठी १ लाख २० हजार रुपये दिले होते. मात्र, दीर्घकाळ उलटूनही ना फर्निचर तयार करण्यात आले, ना पैसे परत करण्यात आले. यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी (दि. १६ मार्च) आरोपीने सचिनला लांझेडा येथील आपल्या घरी बोलावले. सचिन आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीसह तेथे गेला असता, पैशांच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद चिघळताच आरोपीने मिरची पावडर फेकून गोंधळ निर्माण केला आणि त्यानंतर फर्निचर बनवण्याच्या अवजाराने सचिनवर सपासप वार केले. या हल्ल्यात सचिनचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी फरार झाला. माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पथक गठीत करण्यात आले.
दरम्यान, मंगळवारी आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत असून शहरात काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जात आहे. पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here