सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल ‘ग्राहक मित्र गौरव पुरस्काराने’ सन्मानित

103

सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल ‘ग्राहक मित्र गौरव पुरस्काराने’ सन्मानित
The गडविश्व
ता.प्र /कुरखेडा, दि. १६ : जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात ग्राहक पंचायत महाराष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रशासन शाखा गडचिरोली, शिवाजी महाविद्यालय तसेच कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गोकुळनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्राहक मित्र गौरव पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या व साहित्यिक संगीता संतोष ठलाल यांना ‘ग्राहक मित्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन अरुण पाटील मुनघाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. मूळ गाव देऊळगाव व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असलेल्या संगीता ठलाल या साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत. साहित्य सेवा आणि नि:स्वार्थ सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी ‘रानभाज्यांच्या जगात’ हा संशोधनात्मक ग्रंथ लिहून समाजजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या भरीव योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते संगीता ठलाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, समाजात अनेक व्यक्ती नि:स्वार्थ भावनेने कार्य करत असतात; मात्र त्यांची दखल अनेकदा घेतली जात नाही. अशा वेळी अरुण पाटील मुनघाटे यांसारखी व्यक्तिमत्त्वे तळागाळातील कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांचा गौरव करतात, ही आनंदाची बाब आहे. तसेच त्यांनी आपल्या ‘रानभाज्यांच्या जगात’ या संशोधनग्रंथाबद्दलही विचार मांडत आयोजकांचे आभार मानले आणि सर्व पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा पाटील होत्या, तर उद्घाटक म्हणून माधुरी आटमांडे उपस्थित होत्या. यावेळी प्रविण घाटे, रुपचंद फुलझेले, गोविंदराव बानबले, शरद पाटील ब्राह्मणवाडे, अरुण पाटील मुनघाटे, चंद्रशेखर भडांगे, कमलेश तुमसरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शिवाजी महाविद्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Thegdv #thegadvishva #Gadchiroli #KurKheda #SangeetaThalal #ConsumerFriendAward #SocialWork #Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here