कुथे पाटील विद्यालयात आय.सी.टी. लॅबमुळे आधुनिक शिक्षणाची गंगा

175

कुथे पाटील विद्यालयात आय.सी.टी. लॅबमुळे आधुनिक शिक्षणाची गंगा
– ग्रामीण विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानाकडे वाटचाल
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. १६ : समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील अनेक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा (ICT Lab) स्थापन करण्यात आल्या असून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी त्या प्रगतीचे नवे द्वार ठरत आहेत. कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव येथील कुथे पाटील विद्यालयात सुरू झालेल्या आय.सी.टी. लॅबमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाची नवी दिशा मिळाली आहे.
जिल्हा प्रकल्प समन्वयक अविनाश सयाम यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील ४२ शाळांमध्ये आय.सी.टी. लॅब कार्यरत आहेत. कुथे पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक के. जे. बघमारे तसेच इतर सहाय्यक शिक्षकांच्या सहकार्याने संगणक प्रशिक्षक कु. पोर्णिमा ग्यानिराम भैसारे या विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देत आहेत.
विद्यालयातील आय.सी.टी. लॅबमध्ये संगणक, इंटरनेट व प्रोजेक्टरसारख्या आधुनिक सुविधांची उपलब्धता असल्याने विद्यार्थ्यांच्या संगणकीय ज्ञानात लक्षणीय वाढ झाली आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शालेय स्तरावरच संगणकीय शिक्षण घेण्याची संधी मिळत असल्याने त्यांना नव्या संधींचे दरवाजे खुले झाले आहेत.
या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शैक्षणिक माहिती सहज उपलब्ध होत असून, केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता ‘थिअरी क्लास’ आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून संगणकाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि जिज्ञासा वाढताना दिसून येत आहे. भविष्यातील स्पर्धात्मक जगाचा विचार करता, ही आय.सी.टी. लॅब ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत असल्याचे चित्र आहे.
#thegdv #thegadvishva #Gadchiroli #KurKheda #ICTLab #DigitalEducation #SamagraShiksha #RuralEducation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here