परवानगी चातगावची, रेती उतरवली धानोऱ्यात : महसूल विभागाची कारवाई, ट्रॅक्टर जप्त
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १३ : तालुक्यातील सालेभट्टी रेती घाट सर्वांसाठी खुला असून घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती विनामूल्य देण्याची तरतूद आहे. या घाटातून नियमानुसार शासकीय शुल्क भरूनच ठरविलेल्या ठिकाणी रेतीची वाहतूक करणे बंधनकारक आहे. मात्र काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून रेती वाहतूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर तहसीलदार गणेश माळी यांच्या निर्देशानुसार गुरुवार, १२ मार्च २०२६ रोजी महसूल विभागाच्या फिरत्या पथकाने तपासणी मोहीम राबवली. तपासणीदरम्यान धानोरा येथील जुन्या तहसील कार्यालय परिसरातील एकलव्य शाळेच्या बांधकामस्थळी रेतीने भरलेला एक ट्रॅक्टर संशयास्पद स्थितीत आढळून आला.
वाहन क्रमांक MH 33 AC 8090 असलेल्या ट्रॅक्टरची (ट्रॉलीवर क्रमांक नसलेला) कागदपत्रे तपासली असता तो ट्रॅक्टर नंदलाल शेंद्रे यांचा असल्याचे समोर आले. संबंधित वाहनाच्या रेती वाहतूक परवान्याची तपासणी केली असता परवाना ए. के. शिवहारे कन्स्ट्रक्शन, चातगाव या नावाने असल्याचे स्पष्ट झाले. मात्र सदर वाहनाने रेती चातगाव येथे न नेता धानोरा येथील एकलव्य शाळेच्या बांधकामस्थळी रेती उतरवताना आढळल्याने हा प्रकार अवैध असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत दंडात्मक कारवाई करण्यासाठी संबंधित ट्रॅक्टर तहसील कार्यालय, धानोरा येथे उभा करून जप्त करण्यात आला. ही कारवाई तहसीलदार गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार देवेंद्र वाळके व अल्पेश बारापात्रे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, तालुक्यातील विविध ठिकाणी अशाच प्रकारे अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. धानोरा शहरात सुरू असलेल्या मोठ्या शासकीय कामांमुळे रेतीची मागणी वाढली असून अधिक दर मिळत असल्याने काही वाहनचालक नियोजित ठिकाणी रेती न नेता जिथे जास्त पैसे मिळतात त्या ठिकाणी रेती उतरवत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने शहर व परिसरात अचानक तपासण्या वाढवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.













