गडचिरोली : वृद्ध शेतकऱ्याचा गळा चिरून निघृण खून

48

गडचिरोली : वृद्ध शेतकऱ्याचा गळा चिरून निघृण खून
The गडविश्व
भामरागड, दि.१४ : तालुक्यातील अतिदुर्गम नेलगुंडा येथे शेतात रखवालीसाठी झोपलेल्या वृद्ध शेतकऱ्याची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना १० जानेवारी रोजी मध्यरात्री उघडकीस आली. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण भामरागड तालुका हादरला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
प्राप्त माहितीनुसार, पुसू नरंगो हबका (वय ६६, रा. नेलगुंडा ता. भामरागड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पुसू हबका हे शनिवारी रात्री आपल्या घरालगतच्या शेतात पिकांची रखवाली करण्यासाठी खाटेवर झोपले होते. त्यांच्या शेजारीच पत्नी दुसऱ्या खाटेवर झोपली होती. दरम्यान, रात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पुसू हबका यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर पुसू यांच्या पत्नीने केलेल्या आरडाओरडीने परिसरात खळबळ उडाली. गावकरी तात्काळ घटनास्थळी धावले व नेलगुंडा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस पथकाने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
वृद्ध शेतकऱ्याची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत अद्याप कोणताही ठोस खुलासा झालेला नाही. मात्र, शेतीविषयक वादातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने तपास सुरू आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
या घटनेमुळे नेलगुंडा गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मृत पुसू हबका यांच्या पश्चात पत्नी व दोन नातवंडे असा परिवार आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here