शिक्षक न मिळाल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयातच शाळा भरवू
– पेकीनमुडझा येथील पालकांचा इशारा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०९ : धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पेकीनमुडझा येथे एकूण ३६ विद्यार्थी शिक्षण घेत असून इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत केवळ एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर परिस्थितीबाबत संतप्त पालक व ग्रामस्थांनी पाच दिवसांच्या आत शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा शिक्षण विभागाच्या कार्यालयातच विद्यार्थ्यांना बसवून शाळा भरवू, असा इशारा दिला आहे.
या संदर्भात ६ जानेवारी २०२६ रोजी पेकीनमुडझा येथील पालक व ग्रामस्थांनी धानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले. यावेळी गटविकास अधिकारी शासकीय दौऱ्यावर असल्याने दूरध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती देण्यात आली व अधिकृतरीत्या कार्यालयात निवेदन जमा करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित विभागाकडे शिक्षक उपलब्ध नसतील, तर किमान भागातील पात्र डी.एड. व बी.एड.धारक सुशिक्षित बेरोजगारांना तात्पुरत्या स्वरूपात शाळेत सामावून घ्यावे. मात्र कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि तातडीने शिक्षकांची नियुक्ती करून शाळेत रुजू करावे, अशी ठाम मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आतिश खोबरागडे, उपाध्यक्ष कैलास मडावी, सदस्य आशा सोनुले, अंबादास मडावी, भाग्यश्री कावळे, सरपंच पंढरीनाथ कावळे, संजय गावडे, पंकज गजभिये, मीनाक्षी उईके, शशिकला खोब्रागडे, लतीफखा पठाण, संतोष मोहूर्ले, गोपाल कावळे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते.
शिक्षणाच्या हक्कासाठी आता ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेत असून, प्रशासन पुढील पाच दिवसांत काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.













