‘कावळ ऍम्ब्युलन्स’ दाखवत गडचिरोलीतील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

76

‘कावळ ऍम्ब्युलन्स’ दाखवत गडचिरोलीतील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन
The गडविश्व
गडचिरोली, दि.०७ : अपुऱ्या आरोग्य सुविधा व पायाभूत सोयींच्या अभावामुळे गडचिरोली जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने तीव्र आंदोलन छेडले. नुकत्याच घडलेल्या घटनेत वेळेवर उपचार व योग्य वाहतूक सुविधा न मिळाल्याने एका गरोदर मातेचा व तिच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वतःकडे ठेवले असले, तरी प्रत्यक्षात आरोग्य व्यवस्था व रस्ते सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. दुर्गम व आदिवासीबहुल भागात रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्याने अनेकदा गंभीर रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला.
या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘कावळ ऍम्ब्युलन्स’ची प्रतिकृती सादर करत जिल्ह्यातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचा जाहीर निषेध केला. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा तातडीने सक्षम कराव्यात, अतिदुर्गम भागांना जोडणारे रस्ते त्वरित पूर्ण करावेत, तसेच मृत गरोदर मातेच्या कुटुंबाला न्याय व योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली.
या धरणे आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते रामभाऊ मेश्राम, शहराध्यक्ष व नगरसेवक सतीश विधाते, तसेच गडचिरोली, आरमोरी, वडसा, धानोरा व चामोर्शी तालुक्यांतील काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवक, महिला पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here