कुरखेडात दारूबंदीचा फज्जा : तळेगाव बनतेय अवैध दारू विक्रीचे खुले केंद्र

106

कुरखेडात दारूबंदीचा फज्जा : तळेगाव बनतेय अवैध दारू विक्रीचे खुले केंद्र
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून कडक दारूबंदी लागू असताना, कुरखेडा तालुक्यातील तळेगाव गाव अवैध दारू विक्रीचे प्रमुख केंद्र बनत चालल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुका मुख्यालयापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळाली आहे.
विशेष म्हणजे या गावातून शासकीय सेवेत सर्वाधिक युवक कार्यरत आहेत. मात्र, आता हेच गाव दारूच्या विळख्यात अडकत असल्याचे चिंताजनक चित्र दिसत आहे. अल्पवयीन मुलेही दारूच्या सवयीच्या आहारी जात असल्याचे वास्तव समोर येत असून, त्यामुळे संपूर्ण पिढीचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात दारूबंदी कायदा अत्यंत कडक असतानाही, अवैध दारू विक्रीवर प्रभावी आळा बसलेला नाही. गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी विविध कारवायांत लाखो रुपयांची दारू जप्त केली असली, तरी कुरखेडा परिसरात तस्कर निर्भयपणे दारू विक्री करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. दिवाळी, होळी यांसारख्या सणांच्या काळात तस्करी वाढते, मात्र येथे ही विक्री वर्षभर सुरू असल्याचा आरोप होत आहे.
दारूच्या व्यसनामुळे युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून, अनेक कुटुंबांमध्ये वाद, आर्थिक अडचणी व सामाजिक समस्या वाढत आहेत. दारूबंदीचा उद्देशच धुळीस मिळत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या गंभीर प्रकाराकडे प्रशासन व पोलिसांनी तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अन्यथा तळेगावसह संपूर्ण परिसरात सामाजिक अराजक माजण्याची भीती असल्याचा इशाराही स्थानिक सूत्रांकडून देण्यात आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here