चिमूर हादरले : युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

126

चिमूर हादरले : युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या
– अवघ्या तीन तासांत तिघे अटकेत
The गडविश्व
चिमूर, दि. ०५ : शहरातील नेहरू शाळेच्या मागील मोकळ्या जागेत एका युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि. ४) पहाटे उघडकीस आली. आकाश प्रभाकर उताने (३८, रा. तनस कॉलनी, चिमूर) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी जलद हालचाली करत अवघ्या तीन तासांत तिघा आरोपींना अटक करून गुन्ह्याचा छडा लावला.
याप्रकरणी सुजल विलास सोनवाने (२०), छगन मोहन दिघोरे (२७) व अनिकेत शेषराव साखरकर (२४, तिघेही रा. नेताजी वॉर्ड, चिमूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मृत आकाशची आई उषा प्रभाकर उताने यांनी चिमूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आकाश हा शनिवारी (दि. ३) सकाळी घरातून बाहेर पडला होता. रात्री तो घरी न परतल्याने नातेवाईकांकडे थांबला असावा, असा कुटुंबीयांचा अंदाज होता. मात्र रविवारी सकाळीही तो घरी परतला नाही. सकाळी साडेसातच्या सुमारास नातेवाईकांकडून माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले असता आकाश रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला.
घटनास्थळी त्याच्या तोंडावर गंभीर जखमा दिसून आल्या असून कानातून रक्तस्राव सुरू होता. बाजूलाच रक्ताने माखलेला दगड आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. झटापटीच्या स्पष्ट खुणांवरून हा खून एकट्याने नसून दोन ते तीन जणांनी मिळून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला.
संशयावरून पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तीन तासांत तिघा आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक तपासानुसार ही हत्या शनिवारी रात्री ८ ते रविवारी सकाळी ७.१५ वाजताच्या दरम्यान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दिनेश लबडे करीत आहेत. दिवसाढवळ्या शहरात घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे चिमूर परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chuimurnews #chimurnews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here