कोरचीमध्ये जिंदल स्टेनलेसचे कौशल्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी

79

कोरचीमध्ये जिंदल स्टेनलेसचे कौशल्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी
– शेकडो तरुणांना रोजगाराभिमुख मार्गदर्शन
The गडविश्व
ता. प्र / कोरची दि. २६ : कोरची तालुक्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारे एक दिवसीय मोफत स्टेनलेस स्टील वेल्डिंग आणि फॅब्रिकेशन कौशल्य प्रशिक्षण शिबिर आज जिंदल स्टेनलेस लिमिटेड आणि स्वाभिमान फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडले. निर्मल टी-पॉईंट हॉल येथे सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात शेकडो युवकांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
जिंदल स्टेनलेस अकादमीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात सहभागी उमेदवारांना स्टेनलेस स्टील वेल्डिंग, फॅब्रिकेशन तंत्र, सुरक्षितता नियम आणि आधुनिक साहित्याचा वापर याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व सहभागींना टूलकिट, टी-शर्ट आणि जिंदल स्टेनलेस अकादमीचे मान्यताप्राप्त डिप्लोमा प्रमाणपत्र मोफत वितरित करण्यात आले.
जिंदल स्टेनलेस लिमिटेड दरवर्षी देशभरात हजारो एमएसएमई फॅब्रिकेटर, वेल्डर, इंजिनीअरिंग-पॉलिटेक्निक विद्यार्थी आणि औद्योगिक कामगारांना स्टेनलेस स्टील क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण देते. कंपनीची जिंदल स्टेनलेस अकादमी हे शिक्षण, प्रशिक्षण, अपस्किलिंग आणि संशोधनाचे अग्रणी केंद्र मानले जाते. या अकादमीने आतापर्यंत ९,००० हून अधिक इंजिनीअरिंग-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांना आणि हजारो फॅब्रिकेटरांना प्रशिक्षित केले आहे.
कोरचीसारख्या दुर्गम भागात अशा उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाचे आयोजन झाल्याबद्दल स्वाभिमान फाउंडेशनचे संस्थापक तथा संचालक आणि स्थानिक नागरिकांनी जिंदल स्टेनलेस लिमिटेडचे आभार मानले. सहभागी तरुणांनी सांगितले की, “हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र आम्हाला थेट रोजगार मिळवून देण्यास मोठी मदत करेल. स्टेनलेस स्टीलच्या वाढत्या मागणीमुळे आम्हाला चांगले उत्पन्न मिळण्याची खात्री वाटते.”
जिंदल स्टेनलेस लिमिटेडने यापूर्वीही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशी कौशल्य शिबिरे घेतली असून, पुढील काळात गडचिरोली जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ग्रामीण भागातील तरुणांना स्वावलंबी बनवण्याच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाबद्दल जिंदल स्टेनलेस लिमिटेड आणि स्वाभिमान फाउंडेशनची प्रशंशा केली जात आहेत.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #korchi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here