उद्यापासून गडचिरोली जिल्ह्यात २१ रेतीघाटांसाठी ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया

143

– एकूण १ लाख ४ हजार ब्रास वाळूसाठ्यावर ५.६३ कोटींचा Upset Price
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिज शाखेतर्फे २०२५-२६ या वर्षाकरिता जिल्ह्यातील २१ वाळूगट (रेतीघाट) लिलावासाठी ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिया उद्या २९ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येत आहे. वाळू/रेती धोरण २०२५ नुसार आणि राज्यस्तरीय पर्यावरण प्राधिकरणाच्या मंजुरीस अधीन राहून हा पहिला ई-लिलाव आयोजित होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.

ऑनलाईन निविदा वेळापत्रक

ई-निविदा प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून इच्छुक लिलावदारांसाठी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन प्रशिक्षण (वेबिनार) आयोजित केले जाईल.
निविदा सादर करण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे १.०० वाजेपर्यंत असेल. तांत्रिक लिफाफा १२ नोव्हेंबर रोजी उघडण्यात येईल, तर पात्रतेनुसार आर्थिक लिफाफा उघडला जाईल. अंतिम ई-लिलाव (E-Auction) प्रक्रिया १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडेल.
सर्व निविदा दस्तऐवज, अटी व शर्तींचा तपशील http://mahatenders.gov.in आणि http://gadchiroli.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

उपविभागनिहाय रेतीघाटांचा तपशील :

या लिलावात एकूण १,०४,३८२ ब्रास वाळूचा साठा उपलब्ध असून प्रती ब्रास ६००/- प्रमाणे ९० टक्के परिमाणाची एकूण Upset Price ५,६३,६६,२८० इतकी निश्चित करण्यात आली आहे.

गडचिरोली उपविभाग – ४ घाट, १९,८५८ ब्रास वाळू ; वार्षिक उलाढाल बंधनकारक ३ कोटी.

देसाईगंज उपविभाग – ४ घाट, २२,२८० ब्रास ; वार्षिक उलाढाल ४ कोटी.

अहेरी उपविभाग – ११ घाट, ५६,३०८ ब्रास ; वार्षिक उलाढाल ५ कोटी.

कुरखेडा उपविभाग – २ घाट, ५,९३६ ब्रास ; वार्षिक उलाढाल १ कोटी.

लिलावधारकांसाठी प्रमुख अटी :

निविदेचा कालावधी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत असून वाळू उत्खनन ९ जून २०२६ पर्यंत करण्यास परवानगी राहील. पात्र लिलावधारकांनी उत्खनन केलेल्या वाळूच्या १० टक्के वाळू प्रधानमंत्री आवास योजना तसेच आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या घरकुलांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल.
लिलावापूर्वी वाळूसाठा, वाहतुकीसाठीचा रस्ता, वाळूचे स्वरूप (मातीमिश्रित आहे का नाही) याची खात्री करणे हे लिलावधारकाचे कर्तव्य असेल. एकदा ताबा घेऊन उत्खनन सुरू झाल्यानंतर कोणतीही तक्रार किंवा परतावा मान्य केला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रक्रियेचे पर्यवेक्षण जिल्हा खनीकर्म अधिकारी इम्रान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchiroinews #gadchiroipolice #retighat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here