“गोंडवाना विद्यापीठाचा विकास हा जगासाठी आदर्श शिक्षण मॉडेल ठरावा” : पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम
– गोंडवाना विद्यापीठाचा १४ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, दि. ६ : ज्ञान, संशोधन आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम साधणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाने आपल्या स्थापनेच्या १४ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. या निमित्ताने विद्यापीठाचा १४ वा वर्धापन दिन सोहळा विद्यापीठाच्या नव्या सांस्कृतिक सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, प्राचार्य डॉ. देवेश कांबळे आणि डॉ. नंदकिशोर ह. खत्री उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीराम कावळे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. शिल्पा अठावले यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले.
पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, “गोंडवाना विद्यापीठ हे शिक्षण आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडवून आणत आहे. या विद्यापीठाचा विकास हा केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित नसून तो जगासाठी शिक्षणातील आदर्श मॉडेल ठरू शकतो. येथे राबविण्यात येणारे समाजाभिमुख प्रकल्प आणि संशोधन उपक्रम अत्यंत स्तुत्य आहेत. तसेच डॉ. बाबा आमटे यांच्या विचारांचे ‘अध्यासन’ सुरू होणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कुलगुरू डॉ. प्रशांत बोकरे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “गोंडवाना विद्यापीठ हे केवळ शिक्षण देणारे नव्हे, तर जीवनमूल्य देणारे विद्यापीठ आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. विद्यापीठाच्या विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर संस्कार आणि सामाजिक जाणीव मिळत आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात गोंडवाना विद्यापीठ नवे शिखर गाठेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीचे कौतुक करत, “गोंडवाना विद्यापीठ हे ज्ञानदानाचे आणि समाजप्रबोधनाचे केंद्र बनले आहे. या विद्यापीठाच्या उन्नतीसाठी मी सदैव सहकार्य करीन,” अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जीवन गौरव आणि उत्कृष्टता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. “जीवन साधना गौरव पुरस्कार” (मरणोत्तर) ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ स्व. मारोतराव कांबळे (ब्रम्हपुरी) यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार त्यांच्या सुपुत्र प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी स्वीकारला. त्यांनी पुरस्काराची रक्कम विद्यापीठातील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अध्यासन केंद्रासाठी दान केली. तर “जीवन गौरव साधना पुरस्कार” डॉ. नंदकिशोर हरीलाल खत्री यांना देण्यात आला. त्यांनीही पुरस्काराची रक्कम शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी देणगी म्हणून अर्पण केली.
विविध श्रेणींतील उत्कृष्टता पुरस्कार खालीलप्रमाणे जाहीर झाले
उत्कृष्ट अधिसभा सदस्य – गुरुदास कामडी,
उत्कृष्ट महाविद्यालय – आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय, देसाईगंज (वडसा),
उत्कृष्ट प्राचार्य – डॉ. मृणाल काळे (आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा),
उत्कृष्ट शिक्षक – डॉ. अभय सोळुके (श्री. गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय, कुरखेडा),
उत्कृष्ट ग्रंथपाल – डॉ. अनिल भोयर,
विद्यापीठ अधिकारी वर्ग-२ – प्रमोद बोरकर,
विद्यापीठ कर्मचारी वर्ग-३ – अविनाश सिडाम,
महाविद्यालयीन कर्मचारी वर्ग-३ – विनोद चोपावार,
उत्कृष्ट विद्यार्थी – रुपेश पांडूरंग कुत्तरमारे (वरोरा).
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचेही पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट महाविद्यालय एकक म्हणून सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर, आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा आणि गोंडवाना विद्यापीठ पदव्युत्तर विभाग, गडचिरोली यांची निवड झाली. उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ. कुलदीप गौडं, डॉ. मोक्षदा मंदार व डॉ. प्रमोद जावरे यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. दिनकर चौधरी (भिसी) यांना प्रशंसा प्रमाणपत्र मिळाले, तर उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून कु. आर्थिका उपाध्ये, मयुर हनवते व रश्मी कामथे यांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थी विकास विभागाच्या वार्षिकांक स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री. गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय, कुरखेडा, द्वितीय केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी आणि तृतीय निलकंठराव शिंदे महाविद्यालय, भद्रावती यांनी पटकावला.
उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी – प्रा. गजानन बोरकर (आरमोरी), आदर्श विद्यार्थी – संघर्ष गजभीये (मुल), आदर्श विद्यार्थीनी – सिध्दी उपध्या (चामोर्शी), तर निवडणूक जनजागृती अभियानात प्रथम क्रमांक केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी या महाविद्यालयाला मिळाला.
क्रीडा विभागाच्या प्राविण्य स्पर्धेत आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा ने प्रथम आणि सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर ने द्वितीय क्रमांक पटकावला.
या सोहळ्यास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, अधिष्ठाता, अधिसभा सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच स्व. मारोतराव कांबळे यांचे परिवारिय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #GondwanaUniversity #14thAnniversary #Chandrapur #Gadchiroli #DrChandrashekharMeshram #DrPrashantBokare #Theगडविश्व













