वन विभाग गडचिरोली तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून वन महोत्सव २०२२ साजरा

239

The गडविश्व
गडचिरोली, ९ जुलै : वन विभागातर्फे वन महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पर्यावरण व वन विषयक जनजागृती करण्यात आली.
वन महोत्सव निमित्त वनपरिक्षेत्र कार्यालय गडचिरोली अंतर्गत जवाहरलाल नेहरू नगरपरिषद प्राथमिक शाळा गडचिरोली येथे पर्यावरण व वन विषयक चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन चित्रकलेतून पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पना कागदावर रेखाटल्या. चित्रकला स्पर्धेबरोबरच विद्यार्थ्यांना वृक्षांप्रती आपुलकी निर्माण व्हावी व रॅलीच्या माध्यमातून जनजागृती व्हावी या हेतूने विद्यार्थ्यांची व वन कर्मचाऱ्यांची रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये जवाहरलाल नेहरू नगरपरिषद प्राथमिक शाळा गडचिरोली व वसंत विद्यालय गडचिरोली येथील विद्यार्थी सहभागी झाले.
गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. त्यानंतर रॅली वनसंरक्षक कार्यालय पोटेगाव रोड ते कक्ष क्रमांक १७२ वृक्षारोपण स्थळापर्यंत वनसंवर्धनाच्या व वन्यप्राणी संरक्षणाच्या जनजागृती विषयक घोषणा देत नेण्यात आली. रोपवन स्थळी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी व वनाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केले.
वृक्षारोपण स्थळी वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले तसेच उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलनासाठी वन संवर्धन महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.
वन महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम टिपागड सभागृह वनवृत्त कार्यालय गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला. त्यात वन महोत्सव निमित्त घेण्यात आलेले विविध कार्यक्रमात प्राविण्य प्राप्त व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमात मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांनी साध्या सोप्या भाषेत वन व पर्यावरण याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना परसबाग तयार करण्याबाबत मार्गदर्शन करून, मुलांमध्ये वृक्षांबद्दल आपुलकी व आवड कशी निर्माण करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रम वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांच्या मार्गदर्शनात, उपवनसंरक्षक मिलिंद दत्त शर्मा यांच्या नेतृत्वात आयएफएस जमीर शेख , सहाय्यक वनसंरक्षक ( रोहयो ) सोनल भडके, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, ग्रीन गडचिरोलीच्या अध्यक्षा अंजली कुडमेथे, जवाहरलाल नेहरू नगरपरिषद प्राथमिक शाळा गडचिरोलीचे मुख्याध्यापक सुधीर गोहने, शेडमाके, वसंत विद्यालय गडचिरोलीच्या शिक्षिका गीता बिसेन यांच्याउपस्थितीत संपन्न झाले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम ,चातगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पडवे व संपूर्ण वन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here