महिलांनी दारूविक्रेत्यांच्या मनगटावर बांधली राखी

835

– व्यवसाय बंद करण्याची मागितली ओवाळणी
– मसेली ग्रापं समिती व संघटनेचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली : कोरची तालुक्यातील मसेली ग्रापं समिती व मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी गावात अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून तुमचा अवैध व्यवसाय बंद करण्याची ओवाळणी मागितली.
मसेली येथे आयोजित ग्रामसभेत गावातील अवैध धंदे बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. दारू विक्री करणाऱ्यांकडून १० हजार रुपये दंड आकारणे. शासकीय कागदपत्रांपासून वंचित ठेवणे. निर्णयाचे उल्लंघन करीत अवैध दारूविक्री सुरूच ठेवल्यास कायदेशीर मार्गाने पोलिस तक्रार करण्याचेही ठरविण्यात आले आहे. त्यानुसार गावाला दारूमुक्त करण्यासाठी गाव संघटना प्रयत्न करीत आहेत. अशातच रक्षाबंधन या भावा-बहिणीच्या पवित्र सणाचे औचित्य साधून गावातील महिलांनी चक्क दारूविक्रेत्यांनाच राखी बांधून ‘दादा माझ्या नवऱ्याला वाचवा’ अशी विनंती केली.
सोबतच दारूविक्रेत्या भावाच्या हातावर राखी बांधून आपल्या भगिनींचा संसार सुखात चालावा, यासाठी अवैध व्यवसाय बंद करण्याची ओवाळणी मागितली.
यावेळी सरपंच सुनिल सयाम, उपसरपंच विरेंद्र जांभुळकर, तंटामुक्त समीती अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये , मुख्याध्यापक मेश्राम, तालुका संघटक निळा किन्नाके, स्पार्कचा विद्यार्थी सुभम बारसे यांच्यासह मुक्तिपथ ग्रापं समिती व गाव संघटनेचे महिला-पुरुष सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here