महिलांच्या धडक मोहिमेने दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ; २० लिटर दारू जप्त
The गडविश्व
ता.प्र /धानोरा, दि.१९ : धानोरा तालुक्यातील येरकड (पोटावी टोला) येथे अवैध दारूविक्रीविरोधात शक्तिपथ संघटनेच्या महिलांनी धडक मोहीम राबवून अवैध दारूविक्रेत्यांना चांगलाच दणका दिला. मुक्तीपथ शक्तिपथ संघटना (टवेटोला), पोलीस विभाग आणि मुक्तीपथ यांच्या संयुक्त कारवाईत मानसू पोटावी याच्याकडून २० लिटर अवैध दारू आणि दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शक्तिपथ संघटनेच्या महिलांनी कमरेला पदर खोचून शेत-शिवारात कसून शोधमोहीम राबवली. संशयित ठिकाणांची पाहणी करताना अवैध दारूचा साठा आढळून आला. महिलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अवैध दारूविक्रीविरोधातील ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दर दोन दिवसांनी शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईचा धडाका कायम राहणार आहे.
सदर कारवाई पोलीस मदत केंद्र येरकडचे प्रभारी आकाश नेहे, पीएसआय वांडेकर मॅडम आणि त्यांच्या पथकाच्या उपस्थितीत करण्यात आली. मोहिमेत शक्तिपथ संघटनेच्या अध्यक्ष यमुना कुमोटी, उपाध्यक्ष छाया कुमोटी, सचिव आशा जांगधुर्वे यांच्यासह महिला सदस्य सहभागी झाल्या होत्या.
तसेच मुक्तीपथचे तालुका संघटक राहुल महाकुलकर, उपसंघटक भास्कर कड्यामी आणि मुक्तीपथ कार्यकर्त्या मयुरी चिचघरे यांचे मार्गदर्शन व सहभाग लाभला.













