वादळी पावसाचा तडाखा; सागाचे महाकाय झाड रस्त्यावर कोसळले
– निमगाव–मोहटोला मार्गावरील वाहतूक ठप्प; ग्रामस्थांच्या तत्परतेने मार्ग मोकळा
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १९ : तालुक्यातील निमगाव–मोहटोला मार्गावर शुक्रवारी (दि. १८ सप्टेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे सागाचे मोठे झाड रस्त्यावर कोसळले. झाडाने संपूर्ण रस्ता व्यापल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास जोरदार वाऱ्याच्या तडाख्याने सागाचे झाड मुळासकट उन्मळून रस्त्यावर पडले. त्यामुळे निमगाव–मोहटोला मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक अडवली गेली.
घटनेची माहिती मिळताच मासरगाटा येथील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अथक परिश्रम घेत रस्त्यावर कोसळलेले झाड बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली. ग्रामस्थांनी वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी गैरसोय टळली.
दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगतची मोठी व जुनी झाडे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्यालगतच्या धोकादायक झाडांची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून होत आहे.













