कुरखेड्यात वन्यजीव सप्ताहाची जनजागृती; विद्यार्थ्यांच्या वेशभूषेने वेधले लक्ष
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०४ : वन्यजीव सप्ताहानिमित्त कुरखेडा वनपरिक्षेत्राच्या वतीने शहरात जनजागृती दिंडी काढण्यात आली. २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान साजरा होणाऱ्या वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या दिंडीत विद्यार्थी, वनकर्मचारी, पोलीस विभाग आणि भजनी मंडळी सहभागी झाली.
विद्यार्थ्यांनी विविध वन्यप्राण्यांची वेशभूषा करून दिंडीत सहभाग घेतला. त्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. भजनी मंडळींचे भजन आणि पालखी सोहळाही दिंडीचे आकर्षण ठरले.
दिंडीदरम्यान वन्यप्राण्यांचे पर्यावरणातील महत्त्व, त्यांचे नैसर्गिक अधिवास आणि वन्यजीव कॉरिडॉरची आवश्यकता याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. मानवी हस्तक्षेपामुळे वाढणारा मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी गोपुलवाड, श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य नागेश्वर फाये, नोगेश्वर गेडाम, पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी, वनकर्मचारी, भजनी मंडळी तसेच दोन्ही विद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले. वन्यजीव संवर्धनाचा संदेश देत जनजागृती दिंडी उत्साहात पार पडली.













