-ग्रामपंचायत, गावसंघटना व मुक्तिपथला यश
The गडविश्व
गडचिरोली, दि.२२ : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव हे गाव पवित्र देवस्थान असून त्याला विदर्भाची काशी असेही संबोधल्या जाते. या धार्मिक स्थानाला अवैध दारूविक्रीच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत, गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने पुढाकार घेत विविध उपाययोजना केल्यात. गावाने दाखविलेल्या एकीचे फलित म्हणजे मार्कंडादेव हे गाव आताच्या घडीला दारूविक्रीमुक्त गाव म्हणून नावारूपास आले आहे.
मार्कंडा देव हे भगवान शिवाचे लोकप्रिय स्थान आहे आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील सर्वत्रही धार्मिक व्यक्तींसाठी भव्यता आहे. हे गाव वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या देवस्थानाला सीमावर्ती भागातील राज्यांसह इतर जिल्ह्यातील भाविक-भक्त भेट देऊन मनोकामना करतात. गडचिरोली जिल्हा म्हंटले की, डोळ्यासमोर पहिले चित्र राहते ते मार्कंडा देवस्थानाचे. अशा प्रसिद्ध ठिकाणी काही मोजोर विक्रेत्यांनी दारूचा अवैध व्यवसाय सुरु केला. यामुळे धार्मिक स्थळाचे पावित्र भंग होत होते. हे डाग पुसून काढण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेने विविध प्रयत्न केले. तरीसुद्धा काही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला नाही. तेथील महिलांनी व मुक्तिपथ कार्यकर्त्यांनी मिळून दारू विक्रेत्यांना सूचना देऊनही दारू विक्री बंद झाली नाही. गावात अवैधरित्या दारूविक्री केली जात असल्याने गावात भांडण तंटे वाढले होते. गावात भांडण, घरगुती भांडण, तरुण मुलं दारू पिणे या सर्व समस्या लक्षात घेता गावाला दारूविक्रीमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे होते. त्यामुळे गावातील महिलांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून गावातील दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दारुविक्रत्यांना शेवटची ताकीद देत पुन्हा अवैध दारूविक्री केल्यास ठोस कार्यवाही करण्याचा इशारा दिला. अवैध दारूविरोधात गावाची एकी बघून विक्रेते धास्तावले व त्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला. अशाप्रकारे विदर्भाची काशी आज अवैध दारूविक्रीच्या समस्येतून मुक्त झालेली आहे.

ग्रापं पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग
गावातील अवैध दारूविक्री बंदीसाठी सरपंच संगीता मोगरे, उपसरपंच उमाकांत जुनघरे, पोलिस पाटील आरती आभारे, नामदेव आत्राम, यादव कुडसंगे, अध्यक्ष राजू मोगरे, घनश्याम आभारे, गजानन सरपे, रविकांत राऊत, गाव संघटना सदस्य व मुक्तिपथ तालुका चमूने मिळून गावातील दारू विक्रेत्यांना सूचना दिली. दारूविक्रेत्यानी सूचनेचे पालन करीत अवैध दारूविक्रीचा अवैध व्यवसाय बंद केला.
यात्रेतून जनजागृती
मुक्तिपथ अभियान, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, मंदिर समिती, ग्रामपंचायत प्रशासन यासर्वाच्या सहकार्यातून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मार्कंडा देवस्थान यात्रा दरवर्षी दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी स.न. २०१६ पासून मुक्तिपथच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. जनजागृती फेरी काढणे, दुष्परिणाम संदेश फलक दाखवणे, व्यसनमुक्तीपर घोषणा व गाणे म्हणणे, दारू तंबाखू सेवन दुष्परीनामातून शरीराचा सापळा कसा होतो हे दाखवण्यासाठी मास्क व हाडांच्या सापळ्याचा पोशाख घातल्याचे सोंग करणे, विविध पेंडाल मधून जाहीर आवाहन करणे, शंका असलेल्या दुकानांची तपासणी पोलिसांच्या मदतीने करणे, जागृतीसाठी भाविकांना दुष्परिणामांची माहिती पत्रक देण्यात येते. यातून अवैध दारूविक्री बंद करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )