गडचिरोलीत अवजड वाहनांची मनमानी ; आरटीओच्या दुर्लक्षामुळे अपघातांची भीती

84

गडचिरोलीत अवजड वाहनांची मनमानी ; आरटीओच्या दुर्लक्षामुळे अपघातांची भीती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख रस्ते आणि महामार्गांवर खाजगी बसेस, टिपर, डंपर आणि इतर अवजड वाहनांची वाढती मनमानी नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांकडून प्रभावी नियंत्रण व नियमित कारवाईचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, त्यामुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर खनिज, रेती व इतर बांधकाम साहित्याची वाहतूक होत असल्याने अवजड वाहनांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, ही वाहने मुख्य रस्त्यांच्या कडेला व चौकांजवळ अनधिकृतपणे उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी वळणांवर उभी असलेली वाहने समोरून येणारी वाहतूक झाकत असल्याने गंभीर अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून केली जात आहे.
याशिवाय, अनेक टिपर व ट्रक निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करत असल्याचा आरोपही होत आहे. ओव्हरलोड वाहनांमुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले सिमेंट व डांबरी रस्ते अल्पावधीतच खराब होत असून, शासनाच्या निधीवरही त्याचा परिणाम होत आहे. अनेक वाहनांवरील ताडपत्री व्यवस्थित बांधलेली नसते, तर इंडिकेटर, टेल लाइट आणि रिफ्लेक्टर निकामी असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका अधिक वाढतो.
शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर खाजगी बसेस आणि अवजड वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचे चित्रही वारंवार दिसून येते. मात्र, आरटीओ विभागाकडून विशेष तपासणी मोहीम किंवा कठोर कारवाई होत नसल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांमध्ये कायद्याचा धाक उरलेला नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
दरम्यान, शहरातील मुख्य रस्त्यांवर रोज निर्माण होणाऱ्या अवजड वाहनांच्या कोंडीमुळे शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, दुचाकीस्वार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे “आरटीओ विभाग केवळ नावापुरताच उरला आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, आरटीओ विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून ओव्हरलोड वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, तसेच महामार्ग व प्रमुख रस्त्यांवर नियमित तपासणी आणि नाकाबंदी करून वाहतूक शिस्तीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here