वैनगंगा नदीपात्रात दोन युवक बुडाले
The गडविश्व
ब्रम्हपुरी, दि. ०२ : रविवारी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी मित्रांसह नदीकाठावर गेलेल्या दोन युवकांचा वैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील खळकाळा–पिंपळगाव हद्दीत घडली. या घटनेत शुभम पुष्कराज बगमारे (वय २६) व शुभम विजय सहारे (वय १९) या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, खळकाळा परिसरातील सात ते आठ मित्र रविवारी नदीकाठावर गेले होते. जेवणाचा बेत नदीपलीकडील कोंढाळा गावच्या बाजूला आखण्यात आला होता. जेवण आटोपून सायंकाळच्या सुमारास परत येत असताना काही युवक आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले. त्या ठिकाणी खोल डोह असल्याने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चार युवक बुडाले. यावेळी प्रसंगावधान राखत मित्रांनी दोघांना सुखरूप बाहेर काढले मात्र शुभम बगमारे व शुभम सहारे हे दोघे पाण्यात गटांगळ्या खात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी अंधार पडल्याने शोधकार्याला अडथळे आल्याने शोधमोहीम थांबवून दुसऱ्या दिवशी सकाळपासून तहसील प्रशासन, पोलीस यंत्रणा व मच्छिमारांच्या मदतीने नदीपात्रात पुन्हा शोध सुरू करण्यात आला. वृत्त लिहेपर्यंत दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले नव्हते.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नदीकाठावर जाणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














