गडचिरोली : चारचाकीसह 12.21 लाखांचा मुद्देमाल जप्त
– अवैध दारू तस्करांवर प्रहार
The गडविश्व
गडचिरोली,दि. ०२ : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत चारचाकी वाहनासह तब्बल 12 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या पोलिसांच्या भूमिकेला बळ मिळाले आहे.
जिल्ह्यात छुप्या पद्धतीने दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश नीलोत्पल, पोलीस अधीक्षक यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही धडक कारवाई केली. ०१ मार्च रोजी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार अजय चिचघरे (रा. खरपुंडी, ता. जि. गडचिरोली) हा आपल्या साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहन क्रमांक UP 16 DB 0590 मधून पोमके पोटेगाव हद्दीत अवैध विदेशी दारूची वाहतूक करून चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा करणार होता. या माहितीनंतर पथकाने नवरगाव येथे दोन पंचांसह सापळा रचला.
दरम्यान, सदर चारचाकी वाहन नवरगावच्या दिशेने येत असताना पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून वाहनातील दोन इसम अंधाराचा फायदा घेत फरार झाले. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विदेशी व बिअर दारूचा साठा आढळून आला. तपासणीत रॉयल स्टॅग डिलक्स कंपनीच्या 180 मि.ली. क्षमतेच्या 1056 काचेच्या बाटल्या (अंदाजे किंमत 3,16,800 रुपये), 90 मि.ली. क्षमतेच्या 100 काचेच्या बाटल्या (अंदाजे 15,000 रुपये), 1 लिटर क्षमतेच्या 23 काचेच्या बाटल्या (अंदाजे 46,000 रुपये), तसेच हायवर्ड 5000 प्रिमियम बिअर कंपनीचे 500 मि.ली. क्षमतेचे 144 प्लास्टिक टिन (अंदाजे 43,200 रुपये) असा मोठा साठा आढळून आला. यासोबत दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले टाटा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन (अंदाजे किंमत 8 लाख रुपये) जप्त करण्यात आले. असा घटनास्थळावरून एकूण 12,21,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी पोलीस ठाणे गडचिरोली येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम 65(अ), 83, 98(2) अंतर्गत अजय चिचघरे याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेतील फरार आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास मपोउपनि. सीमा किंकर, पोमके पोटेगाव करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनी अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकात सपोनि समाधान दौड, पोअं रोहित गोंगले, पोअं प्रशांत गरफडे, चापोअं रामदास उईनवार यांचा समावेश होता. दारूबंदीची कठोर अंमलबजावणी सुरूच राहणार असून, अवैध दारूविक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात अशीच कारवाई पुढेही केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.














