एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, कोरची येथे प्रवेशपूर्व परीक्षा उत्साहात संपन्न
-३४० विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ०२ : एकलव्य आदर्श निवासी विद्यालय (EMRS) कोरची येथे इयत्ता सहावी ते नववी वर्गांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली प्रवेशपूर्व परीक्षा रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे आपली वाटचाल अधिक दृढ केल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ९८ मुले व ९५ मुली असे एकूण १९३ विद्यार्थी परीक्षेला बसले. इयत्ता सातवीसाठी २० मुले व ३४ मुली असे ५४ विद्यार्थी, इयत्ता आठवीसाठी २६ मुले व ३२ मुली असे ५८ विद्यार्थी, तर इयत्ता नववीसाठी १३ मुले व २२ मुली असे ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
अशा प्रकारे इयत्ता सहावी ते नववी या वर्गांसाठी एकूण १५७ मुले व १८३ मुली, मिळून ३४० विद्यार्थी कोरची येथील परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. विशेष म्हणजे मुलींची लक्षणीय उपस्थिती ही शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदलाचे ठळक द्योतक मानली जात आहे.
परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून विद्यालयाचे प्राचार्य धर्मेंद्र सिंह ठाकुर यांनी संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे व जबाबदारीने पार पाडली. परीक्षेच्या पारदर्शकतेची खात्री करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी नरेंद्र दादाजी कावळे यांनी परीक्षा केंद्रास भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला व समाधान व्यक्त केले.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोरची पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला. याबद्दल प्राचार्य धर्मेंद्रसिंह ठाकुर यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुयोग्य आसनव्यवस्था, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा, मार्गदर्शन व्यवस्था तसेच शिस्तबद्ध देखरेख यांची योग्य खबरदारी घेण्यात आली होती. परीक्षा केंद्रप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्तम समन्वयातून संपूर्ण परीक्षा प्रक्रिया शांततामय व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.
एकलव्य आदर्श निवासी विद्यालय, कोरची येथे पार पडलेली ही प्रवेशपूर्व परीक्षा यशस्वी ठरून आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्याचा पाया अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारे ठरणार आहे.














