ज्ञानाची मशाल पेटली : जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०२ : विज्ञानाची ज्योत सदैव तेवत ठेवण्याचा निर्धार करत जिल्हा परिषद हायस्कूल, धानोरा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. थोर भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी ‘रमण इफेक्ट’चा ऐतिहासिक शोध लावल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड, जिज्ञासा आणि वैज्ञानिक विचारसरणी रुजविण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक तथा विज्ञान व गणित विषय शिक्षक प्रशांत साळवे होते. कार्यक्रमास बुरमवार, तोटावार, शेंडे, कोल्हटकर, मोहन देवकते, रजनी, कांचन दशमुखे, प्रियंका आनंदवार, रेखा कोरेवार, ओम देशमुख, भालेराव आदी शिक्षकवर्ग उपस्थित होता.
प्रमुख वक्ते विज्ञान शिक्षक मोहन देवकते यांनी विज्ञान विषयावर रोचक व सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विज्ञानातील महान शोधांची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांसमोर उलगडली. “चुका करा आणि त्यातून शिका” हा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना छोटे-छोटे प्रयोग करण्यास प्रोत्साहित केले. महान शोध हे लहान निरीक्षणांतूनच जन्म घेतात, हे त्यांनी ठसवून सांगितले. तसेच हवामान बदल, अन्नसुरक्षा यांसारख्या ज्वलंत समस्यांवर विज्ञानाची भूमिका स्पष्ट करत प्रत्येक घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यानंतर शंकर रत्नागिरी यांनी रमण इफेक्टची वैज्ञानिक संकल्पना सोप्या व रंजक पद्धतीने समजावून सांगत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. कोल्हटकर यांनी वैज्ञानिक जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट करत समाजात वैज्ञानिक विचारांची रुजवात हीच खऱ्या शिक्षणाची फलश्रुती असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रशांत साळवे यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विज्ञानातील विविध संकल्पना उलगडल्या. दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या बदलांमागील वैज्ञानिक कारणमीमांसा समजावून सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना जिज्ञासू व विचारप्रवण बनण्याचा संदेश दिला. विज्ञानाची जनजागृती करणे आणि प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक नजरेने पाहणे म्हणजेच खऱ्या अर्थाने वैज्ञानिक होणे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर रत्नागिरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण शेंडे यांनी मानले. विविध उपक्रमांनी सजलेल्या या विज्ञान दिनाने विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची ओढ निर्माण करत कार्यक्रम चिरस्मरणीय ठरला. जिल्हा परिषद हायस्कूल, धानोरा यांचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.














