– नियमित वेतनश्रेणी देण्याची मागणी
The गडविश्व
अहेरी, २ सप्टेंबर : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित करून वेतनश्रेणी देण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील एकलव्य शाळेवर कर्तव्यावर हजर राहून ५ सप्टेंबरपासून शिक्षक आमरण उपोषण करणार आहेत.
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य संचलित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सन २०१८ आणि २०१९ मध्ये झाली होती. पदभरतीमधील जाहिरात आणि नियुक्ती आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले होते की तीन वर्ष परिवीक्षा कालावधी पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन अहवाल समाधानकारक असल्यास कर्मचाऱ्यांना नियमित करून वेतनश्रेणी देण्यात येईल. परंतु सर्व कर्मचारी यांचे कामांचे मूल्यांकन अहवाल जाऊनही परिवीक्षा कालावधी विलोपित झाला नाही म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी प्रकल्प अधिकारी, प्रधान सचिव, आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र तसेच मुख्यमंत्र्यांना वारंवार निवेदने दिली. तसेच या दोन्ही २०१८ व २०१९ बॅचचे दोन प्रतिनिधी नेस्ट जनजाती मंत्रालय भारत सरकार दिल्ली येथे चर्चेसाठी २८ जुलै २०२३ रोजी गेली होती. तरीही कर्मचाऱ्यांचा परीविक्षा कलावधी विलोपित झाला नाही.
२०१८ व २०१९ मधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे ६ वे व ५ वे वर्ष चालू असून या सर्वांमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि मानसिक खच्चीकरण होत असून एक शिक्षक म्हणून राज्यातील कानाकोपऱ्यात आणि अती दुर्गम भागात काम करून आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या आणि भारतातील सुजाण नागरिक घडविणारा शिक्षक मात्र त्यांच्या हक्कापासून वंचित आहे. आमरण उपोषणात एकलव्य मॉडेल रेसी. स्कुल अहेरी येथिल मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा सहभागी होणार आहेत.
