आश्रमशाळांमध्ये सर्पदंश टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्या

95

आश्रमशाळांमध्ये सर्पदंश टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्या
– विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सतर्क राहावे; सर्पमित्र अजय कुकडकर यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : पावसाळ्यात सापांचा वावर वाढण्याची शक्यता असल्याने निवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंशाच्या घटना टाळण्यासाठी शाळा प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी परिसराची नियमित स्वच्छता, रात्री पुरेसा प्रकाश आणि आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवावी, असे आवाहन सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक अजय कुकडकर यांनी केले आहे.

पावसामुळे सापांच्या बिळांमध्ये पाणी जाणे तसेच भक्ष्याच्या शोधात साप मानवी वस्तीजवळ येण्याची शक्यता असते. त्यामुळे आश्रमशाळेच्या इमारतीभोवती वाढलेले गवत-झुडपे, कचरा, दगड व लाकडांचे ढीग हटवून परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. भिंतीतील भगदाडे, दरवाज्यांखालील फटी, खिडक्या तसेच पाईपच्या आसपासच्या जागा बंद कराव्यात. विद्यार्थ्यांना शक्यतो जमिनीवर झोपवू नये. झोपण्यापूर्वी बेड, गादी व चादरी तपासण्याची सवय लावावी.

शाळेतील स्वयंपाकघर व भोजनगृहात अन्नकचरा साचू देऊ नये. उंदरांचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी रात्री बाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा. अंधाऱ्या ठिकाणी हात घालणे किंवा दगड-लाकूड उचलणे टाळावे.

शाळेच्या परिसरात साप आढळल्यास विद्यार्थ्यांनी त्याच्या जवळ जाऊ नये किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर ठेवून प्रशिक्षित सर्पमित्र अथवा वनविभागाला माहिती द्यावी. सर्पदंश झाल्याचा संशय आल्यास वेळ न दवडता विद्यार्थ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करावे. जखम कापणे, विष तोंडाने शोषणे, घट्ट दोरी बांधणे, बर्फ लावणे किंवा कोणतेही घरगुती उपचार करणे टाळावे.

प्रत्येक निवासी आश्रमशाळेत जवळच्या रुग्णालयाचा संपर्क क्रमांक, रुग्णवाहिका सेवा, पालकांचे संपर्क क्रमांक तसेच सर्पमित्र व वनविभागाशी तातडीने संपर्क साधण्याची व्यवस्था असावी. शिक्षक व कर्मचाऱ्यांना सर्पदंशाच्या प्रसंगी करावयाच्या प्राथमिक उपाययोजनांचे प्रशिक्षण देणेही आवश्यक आहे.

“सर्पदंशाची घटना घडल्यानंतर उपाय करण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे अधिक महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासन, शिक्षक, कर्मचारी आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी भीती निर्माण करण्याऐवजी सुरक्षिततेबाबत योग्य जनजागृती करावी,” असे अजय कुकडकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here