‘केवळ कागदोपत्री तपासणी नको’ ; जपतलाई प्रकरणी सर्व आश्रमशाळांची प्रत्यक्ष पाहणी करा

41

‘केवळ कागदोपत्री तपासणी नको’ ; जपतलाई प्रकरणी सर्व आश्रमशाळांची प्रत्यक्ष पाहणी करा
— शिवसेना (उ.बा.ठा)चे जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांची पत्रकार परिषदेत मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील खासगी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सर्पदंशामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केवळ कागदोपत्री तपासणी न करता जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी आश्रमशाळांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा ऑडिट करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच मागणीचे निवेदन अपर आयुक्त आरुषी सिंग यांना प्रकल्प अधिकारी एम. अरुण यांच्या मार्फत सादर केले.
जपतलाई येथील घटनेची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून विद्यार्थिनींच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित करावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचारी तसेच संस्थाचालकांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही गेडाम यांनी केली.
आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, स्वच्छ परिसर, पुरेशी प्रकाश व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळणे आवश्यक आहे. मात्र, जपतलाईच्या घटनेमुळे या मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी करून परिसरातील झाडाझुडपे व धोकादायक ठिकाणांची साफसफाई, सर्पदंशासह इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय व्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा उपायांची उपलब्धता तपासावी. विद्यार्थ्यांना मिळणारे भोजन, पाणी, निवास, स्वच्छता व आरोग्य सुविधा यांचीही प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच आश्रमशाळांना मिळणाऱ्या शासकीय निधीचा योग्य वापर झाला आहे की नाही, याची तपासणी करून गरज भासल्यास विशेष लेखापरीक्षण करावे. प्रत्येक आश्रमशाळेसाठी स्वतंत्र सुरक्षा व आपत्कालीन कृती आराखडा तयार करून नियमित अनपेक्षित तपासणीची व्यवस्था करावी, असेही गेडाम यांनी सांगितले.
मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत व आवश्यक शासकीय सहाय्य द्यावे. जपतलाई प्रकरणातील चौकशी पारदर्शकपणे करून दोषींवर झालेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
“आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव कोणत्याही प्रशासकीय हलगर्जीपणापेक्षा मोठा आहे. जपतलाईसारखी घटना पुन्हा घडू नये, यासाठी केवळ आश्वासन नको, तर ठोस कार्यवाही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही,” असा इशारा पवन गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here