‘जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करा’; अन्यथा ४ सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन

28

‘जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करा’; अन्यथा ४ सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन
– अमिता मडावी यांचा इशारा, चौकशी होऊनही कार्यवाही नसल्याचा आरोप
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी होऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे डॉ. लहाडे यांची जिल्हा शल्यचिकित्सक पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य अमिता शामकांत मडावी यांनी पत्रकार परिषदेत केली. शासनाने पुढील १५ दिवसांत कारवाई न केल्यास ४ सप्टेंबरपासून उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांच्या कार्यालयासमोर पुन्हा बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मडावी यांनी सांगितले की, डॉ. लहाडे यांच्या कार्यपद्धतीसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, उपसंचालक आरोग्य सेवा आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या प्रकरणी उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांच्या कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशी होऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
या मागणीसाठी ७ ऑगस्टपासून उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी उपसंचालकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र, आश्वासनानुसार १५ दिवसांत कारवाई न झाल्यास ४ सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे मडावी यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत मडावी यांनी डॉ. लहाडे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागांचे स्थलांतर, कर्मचारी व डॉक्टरांना कथित त्रास, सुरक्षारक्षकांचा बंगल्यावर वापर तसेच रुग्णालयातील काही प्रशासकीय निर्णयांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील डॉक्टरांच्या राजीनाम्यांमागील परिस्थितीचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
डॉ. लहाडे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी गडचिरोलीतील एका लिपिकाला नाशिक येथे कामासाठी नेण्यात आल्याच्या आरोपाचीही चौकशी करावी, अशी मागणी मडावी यांनी केली. तसेच तक्रार मागे घेण्यासाठी आपल्या घरी काही व्यक्तींना पाठविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षारक्षकांची कमतरता असताना तीन सुरक्षारक्षक डॉ. लहाडे यांच्या बंगल्यावर ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. हे सुरक्षारक्षक कोणत्या नियमांनुसार बंगल्यावर नियुक्त करण्यात आले, याची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली.
डॉ. लहाडे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मडावी यांनी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here