– गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचा अभ्यास दौरा
The गडविश्व
गडचिरोली,दि २१ : गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाचा कामकाज जाणून घेतला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि जनसंवाद विभागाच्या समन्वयक डॉ. रजनी वाढई यांच्या मार्गर्शनात या अभ्यास दौऱ्याचे आयोजन १९ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यार्थ्यांच्या बस ला हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा देत रवाना केले.
या दौऱ्यात विद्यार्थ्यांना विधानसभा आणि विधानपरिषदेतील प्रेक्षक गॅलरीत बसून सभागृहातील आमदार राज्याच्या विविध भागातील प्रश्न कशा प्रकारे मांडतात हे बघता आणि अनुभवता आले. दरम्यान राष्ट्रकुल संसदीय मंडळ कक्षात विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांची विद्यार्थ्यांनी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी मदाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव त्यांच्यापुढे थोडक्यात कथन केले. विधिमंडळाचे सभागृह, विधिमंडळ परिसर, राष्ट्रकुल मंडळ, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची धावपळ, राजकीय पक्षांचे कार्यालये, मंत्री, आमदार, अधिकारी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल विद्यार्थ्यांना बघता आणि अनुभवता आली. यावेळी काही आमदार आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत विद्यार्थ्यांनी फोटोही काढले. अनेक आठवणी साठवून विद्यार्थ्यांनी निरोप घेतला. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना अनेक माहिती अवगत करता आली. कामकाजातील तांत्रिक बाबी कळाल्या, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली, ज्ञानात भर पडली. त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात आणि आयुष्यात या अभ्यास दौऱ्याची शिदोरी उपयोगी पडणार आहे. या दौऱ्यात जनसंवाद विभागाचे स. प्रा. डॉ. संजय डाफ, स. प्रा. डॉ. चैतन्य शिनखेडे, स. प्रा. डॉ. सरफराज अन्सारी, स. प्रा. रोहित कांबळे, लिपिक योगिता कुंभारे सहभागी झाले होते.