गडचिरोली मुख्य डाकघरात रेव्हेन्यू तिकिटांचा तुटवडा; महिनाभरापासून नागरिकांची फरफट

36

गडचिरोली मुख्य डाकघरात रेव्हेन्यू तिकिटांचा तुटवडा; महिनाभरापासून नागरिकांची फरफट
– ग्राहक पंचायत आक्रमक; डाक अधीक्षकांना निवेदन देत तातडीने पुरवठ्याची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : गडचिरोली मुख्य डाकघरात मागील महिनाभरापासून रेव्हेन्यू तिकीट उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयातील मुख्य डाकघरातच तिकिटांचा तुटवडा निर्माण झाल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायतने या प्रश्नाकडे डाक विभागाचे लक्ष वेधले आहे.
ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष उदय धकाते यांनी १८ सप्टेंबर रोजी डाक अधीक्षक डी. आर. नरसिंहराव यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले. विविध आर्थिक व्यवहार, पावत्या, देयके, करारनामे तसेच शासकीय व निमशासकीय कामकाजासाठी रेव्हेन्यू तिकिटांची आवश्यकता भासते. मात्र, मुख्य डाकघरातच ती उपलब्ध नसल्याने नागरिकांना तिकिटासाठी इतरत्र भटकंती करावी लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गडचिरोली हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातून नागरिक विविध कामांसाठी येथे येतात. डाकघरात तिकीट उपलब्ध नसल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असल्याचा मुद्दा ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे.

तातडीने पुरवठा करण्याची मागणी

मुख्य डाकघरात रेव्हेन्यू तिकिटांचा पुरेसा साठा तातडीने उपलब्ध करून देण्यासोबतच नियमित पुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे. तिकीट उपलब्ध नसल्यास नागरिकांना स्पष्ट माहिती मिळावी यासाठी सूचना फलक लावावा. तसेच जिल्ह्यातील इतर डाकघरांमध्येही तिकिटांची उपलब्धता तपासून आवश्यक ठिकाणी पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
रेव्हेन्यू तिकिटांचा तुटवडा नेमका का निर्माण झाला, याची प्रशासकीय स्तरावर चौकशी करून भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच निवेदनावर झालेल्या कार्यवाहीची लेखी माहिती ग्राहक पंचायतला द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी ग्राहक पंचायतचे सचिव अरुण पोगळे उपस्थित होते.

“जिल्ह्याच्या मुख्यालयातील मुख्य डाकघरातच रेव्हेन्यू तिकीट महिनाभर उपलब्ध नसणे ही नागरिकांसाठी अनावश्यक अडचण आहे. ग्रामीण व दुर्गम भागातून येणाऱ्या नागरिकांना तिकीटासाठी पुन्हा-पुन्हा फिरावे लागू नये. डाक विभागाने तातडीने दखल घेऊन पुरवठा सुरळीत करावा.”

– उदय धकाते, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गडचिरोली

#thegadvishva #thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #postoffice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here