खळबळजनक! तेंदूपत्ता संकलन करताना वाघिणीच्या हल्ल्यात चार महिला ठार

125

खळबळजनक! तेंदूपत्ता संकलन करताना वाघिणीच्या हल्ल्यात चार महिला ठार
– सिंदेवाही तालुका हादरला
The गडविश्व
चंद्रपूर / सिंदेवाही, दि. २२ : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात शुक्रवारी (२२) सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर अचानक वाघिणीने हल्ला चढवल्याने चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही परिसरातील काही महिला जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. जंगलात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू असतानाच अचानक दबा धरून बसलेल्या वाघिणीने महिलांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचविण्यासाठी महिला सैरावैरा पळू लागल्या. मात्र, वाघिणीच्या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिलांपैकी एक महिला जीवाच्या आकांताने गावात पोहोचली. तिने आरडाओरड करत ग्रामस्थांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने जंगल परिसरात धाव घेतली. तेव्हा घटनास्थळी चार महिलांचे मृतदेह आढळून आल्याने गावात शोककळा पसरली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच इतर महिला सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या भीषण घटनेनंतर जंगल परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करून मानवी जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpurnews #Chandrapur #Sindewahi #TigerAttack #TigerAttackNews #ForestNews #TenduPatta #BreakingNews #MaharashtraNews #WildlifeAttack #ForestDepartment #JungleNews #TigerAttackInChandrapur #Maharashtra #Breaking #ViralNews #LocalNews #NewsUpdate #Wildlife #TrendingNews #TigerNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here