गडचिरोलीत बनावट नोटांचा काळाबाजार उघड ; पोलिसांच्या धाडीत चौघे जेरबंद

81

गडचिरोलीत बनावट नोटांचा काळाबाजार उघड ; पोलिसांच्या धाडीत चौघे जेरबंद
– हायटेक प्रिंटर, बॉण्ड पेपरसह 39 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : जिल्ह्यात बनावट चलनी नोटांचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गडचिरोली पोलिसांनी धडक कारवाई करत संपूर्ण रॅकेटच उद्ध्वस्त केले आहे. एटीएममध्ये जमा झालेल्या बनावट नोटांमुळे या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. पोस्टे गडचिरोली आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून बनावट नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा हायटेक प्रिंटर, बॉण्ड पेपर, बनावट चलनी नोटा आणि इतर साहित्य असा एकूण 39 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्र, गडचिरोली शाखेच्या एटीएम डिपॉझिट मशीनमध्ये जमा झालेल्या काही नोटा संशयास्पद आढळल्या. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान प्रमोद टिकाराम कोवे (वय 23, रा. हळदा, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) याने 100 रुपयांच्या 21 बनावट नोटा एटीएममध्ये जमा केल्याचे उघड झाले. पोलिसांनी 15 मे रोजी रात्री त्याला अटक केली.
चौकशीदरम्यान आरोपीने या नोटा आदित्य जनार्धन रेचनकर (वय 19, रा. गडचिरोली) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. पुढील तपासात धक्कादायक माहिती समोर आली. नागपूर येथे वास्तव्यास असलेल्या ‘चिटू’ नावाच्या व्यक्तीकडून बनावट नोटा आणल्या जात असल्याचे निष्पन्न झाले.
या धाग्यावरून गडचिरोली पोलिसांचे संयुक्त पथक तातडीने नागपूरला रवाना झाले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे नागपूर शहरातील त्रिमूर्ती नगर परिसरातील एका फ्लॅटवर पोलिसांनी धाड टाकली. झडतीदरम्यान फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापण्याचे संपूर्ण ‘सेटअप’ उघड झाले.
या कारवाईत हायटेक कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, कटर, अर्धवट छापलेल्या 50, 100 आणि 200 रुपयांच्या नोटा, कटिंग साहित्य आणि बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणी मयुर लक्ष्मीकांत डोईजड (वय 31), आदित्य लक्ष्मीकांत डोईजड (वय 26), आदित्य जनार्धन रेचनकर (वय 19) तिघेही रा. गडचिरोली आणि यापूर्वी अटक करण्यात आलेला प्रमोद कोवे अशा चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना 22 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गडचिरोली पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात बनावट चलनी नोटांचा काळाबाजार उघड झाला असून तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पोस्टे गडचिरोलीच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here