अबब…बनावट आयडीवर ४०० ब्रास वाळू गायब, गडचिरोलीत प्रशासनालाच ‘हॅक’
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०९ : जिल्ह्यात घरकुल लाभार्थी वाळूच्या एका कणासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत असताना, बनावट ओळख तयार करून ‘महाखनिज’ पोर्टलच्या माध्यमातून तब्बल ४०० ब्रास वाळू लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनालाच ‘हॅक’ करण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे.
माहिती अधिकारातून उघड झालेल्या कागदपत्रांनुसार, कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील सती नदी पात्रातून ही वाळू अवैधरित्या उपसण्यात आली. विशेष म्हणजे, ज्या ग्रामसेवकाच्या नावावर हा व्यवहार दाखवण्यात आला, त्या ग्रामपंचायतीला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, सुमारे ३ लाख रुपयांच्या शासकीय शुल्काची नोंदही आढळून आलेली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता वाळू उपशाचे परवाने देण्यात आल्याचा आरोप असून, या संपूर्ण प्रकरणात अधिकारी व खासगी कंत्राटदार यांच्यात संगनमत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘दिल्ली कनेक्शन’ असलेल्या कंत्राटदाराला फायदा मिळवून देण्यासाठी प्रशासनाचा वापर करण्यात आल्याचीही चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
राज्य शासनाच्या ‘वाळू धोरण २०२५’नुसार घरकुल लाभार्थ्यांना प्राधान्याने वाळू देणे अपेक्षित असताना, या प्रकारामुळे त्या धोरणाच्या अंमलबजावणीवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. कुरखेडा येथील तहसीलदार राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची संमती न घेताच परवाने दिल्याचा आरोप होत असून, त्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नासीर हाश्मी यांनी या प्रकरणातील पुरावे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराकडून नियमानुसार दुप्पट दंड वसूल करावा, अशीही मागणी पुढे येत आहे.
या संदर्भात तहसीलदारांकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी ‘असे काही घडलेले नाही’ असे सांगत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली असून, जबाबदारी नायब तहसीलदारांकडे ढकलण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या हाय-प्रोफाईल वाळू घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल का, याकडे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #Gadchiroli #SandScam #BreakingNews #MahaKhanij #FakeID #Corruption #HousingScheme #Kurkheda #MaharashtraNews #ScamAlert #AdministrativeFailure #SandMafia #RTIRevelation #LocalNews #IndiaNews














