सावरगाव पोलिसांचा आदिवासी दिनानिमित्त विविध योजनांचा जागर

491

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १० : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यातिश देशमुख यांच्या संकल्पनेतून व धानोरा चे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र सावरगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी दिनानिमित्त मोठ्या जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यात आला.
मेळाव्याचे उद्घाटन सावरगाव हद्दीतील ४० गाव चे पुजारी कांगुराम नरोटे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावरगाव चे गाव पुजारी राम साय गावडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक बर्डे, सरपंच मोनिका पुडो, कमलेश मडावी, सीआरपीएफ चे पी आय पात्रा, मोहन सिंग, एस आर पी एफ चे पी आय पाटोळे, पोलीस पाटील सियाराम पुडो, पत्रकार संघटनेचे दिवाकर भोयर, बडोदे , करमरकर, देशमुख आदी उपस्थित होते.
आदिवासी दिनानिमित्त आयोजित मेळाव्याची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सोबतीने गावभर रॅलीने झाली. व नंतर विविध प्रकारचे १०० रोपट्यांचे वृक्षारोपण पोलीस मदत केंद्राच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आदिवासी बहुल नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल विविध सामाजिक उपक्रम जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून राबवत असते त्यांचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन प्रभारी अधिकारी विश्वंभर कराळे यांनी केले. यावेळी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती त्यांनी उपस्थित जनतेला दिली.
आयोजित जनजागरण मेळाव्यात आदिवासी बांधवांतील ज्यांचे शिक्षण बंद झाले होते अशा 60 मुला मुलींना पदवीच्या शिक्षणासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये प्रथम वर्षासाठी मोफत प्रवेश दिला, तसेच 18 पॅन कार्ड, 33 श्रावण बाळ योजना, 20 आधार कार्ड, 5 निराधार, 4 उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 13 लाईट बिल भरणा यासारख्या शासकीय योजनांचा लाभ व्ही एल इ मार्फत देण्यात आला.
या मेळाव्यासाठी सावरगाव हद्दीतील 500-600 आदिवासी बांधव उपस्थित होते.उपस्थित बांधवांना सावरगाव पोलिस विभागाकडून 50 साडी, 30 मच्छरदाणी, 12 टी-शर्ट , 12 पॅन्ट, 15 घमेले, 10 स्कूल बॅग, 40 नोटबुक, 30 रेनकोट, व 50 रोपट्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी अधिकारी विश्वंभर कराळे यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कोळेकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेणीपोउपनि येनगंटीवार, चावर, राऊत, कागदेलवार,पोलिस हवालदार नैताम, भुरकुरे, काळबांदे, प्रधान कुंमरे, गेडाम, व एस आर पी एफ गट क्रमांक अकरा नवी मुंबईचे सर्व अंमलदारांनी परिश्रम घेतले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolilocalnews #dhanora )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here