– नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १९ : तालुक्यातील नागरिकांच्या विविध व गंभीर समस्यांकडे शासन व प्रशासनाने केलेले संपूर्ण दुर्लक्ष लक्षात घेता काँग्रेसच्या वतीने येरकड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अपूर्ण रस्ते, सिंचन सुविधा अभाव, विस्कळीत आरोग्य व्यवस्था, शिक्षण क्षेत्रातील उदासीनता आणि रोजगाराच्या संधींचा अभाव या प्रश्नांनी जनता त्रस्त झाली असून, शासनाचे केवळ आश्वासनापुरते मर्यादित धोरण आता नागरिकांना असह्य झाले आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, गडचिरोली विधानसभा निरीक्षक संदेशजी सिंगलकर, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, महिला जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, तसेच तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लालाजी धुर्वे, सौं. रुकमाबाई धुर्वे, सौं. शेवंता हलामी, कुलदीप इंदूरकर, शेरखा पठाण, लक्षुमण डोकरमारे, सखाराम नैताम, भास्कर मेश्राम, शालिक पर्सा, एकनाथ काटेंगे, दिवकर उशेंडी, मादगू आतला, शिवप्रसाद गवर्णा आदींनी जनतेच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
काँग्रेसच्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी नेत्यांनी दिला.













