अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाचा दणका ; ट्रॅक्टरसह १ ब्रास रेती जप्त
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १० : धानोरा तालुक्यात अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारत एका ट्रॅक्टरसह रेतीचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून महसूल विभागाच्या धडक मोहिमेची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजताच्या दरम्यान धानोरा तहसील कार्यालयाच्या अवैध गौण खनिज पथकाने उदेगाव परिसरात गस्त घालत असताना विनापरवाना रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळून आले. पथकाने तत्काळ कारवाई करत ट्रॅक्टर (क्र. एमएच ३३ एसी ८३०५) व ट्रॉली (क्र. एमएच ३६ एजी ५८८१) ताब्यात घेतली.
तपासणीदरम्यान वाहनातून सुमारे १ ब्रास रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महसूल विभागाने ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
सदर वाहन रामरतन टिकाराम गोहने (रा. गिलगाव) यांच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या धडक कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.














