मुरूमगाव पोलिसांच्या प्रयत्नांनी निराधार मातेला दिलासा ; दोन लाखांची उधारी परत मिळवून दिली
– “सेवा, सुरक्षा आणि संवेदनशीलता”चा प्रत्यय ; आईच्या चेहऱ्यावर पुन्हा फुलले हास्य
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०६ : मुरूमगाव पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत एका निराधार मातेला न्याय मिळवून देत मानवतेचा आदर्श घालून दिला आहे. दोन वर्षांपूर्वी मुलगा व मुलीच्या निधनामुळे संकटात सापडलेल्या शीतलबाई कुंजाम यांना त्यांच्या दिवंगत मुलाच्या व्यवसायातील सुमारे दोन लाख रुपयांची थकीत उधारी परत मिळवून देण्यात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मुरूमगाव परिसरातील निखिल कुंजाम हा गिट्टी, लोखंड व बांधकाम साहित्य विक्रीचा छोटा व्यवसाय करीत होता. व्यवसायाच्या निमित्ताने त्याने अनेकांना उधारीवर माल दिला होता. मात्र अपघातात त्याचा मृत्यू झाल्यानंतर अनेकांनी उधारीची रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. त्यातच मुलीच्या निधनाने कुटुंबावर दुहेरी आघात झाला आणि आई शीतलबाई कुंजाम पूर्णपणे निराधार झाल्या.
आर्थिक अडचणींनी ग्रासलेल्या शीतलबाईंनी मदतीसाठी मुरूमगाव पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी आणि पोलीस अमलदार नागेश बोयना यांनी पुढाकार घेत संबंधित देणेकऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या घरी भेटी देऊन कायदेशीर जबाबदारीची जाणीव करून दिली. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेकांकडून थकीत रक्कम वसूल करण्यात यश आले.
कायद्याच्या चौकटीत राहून केलेल्या या प्रयत्नांमुळे शीतलबाई कुंजाम यांना मोठा आर्थिक आधार मिळाला असून अनेक महिन्यांपासून सुरू असलेली मानसिक व आर्थिक घालमेल दूर झाली आहे. पोलिसांच्या या संवेदनशील कार्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी यांनी, “कायद्याचे पालन करताना मानवतेची जपणूक करणे हीच खरी पोलीस सेवेची ओळख आहे,” असे मत व्यक्त केले. मुरूमगाव पोलिसांच्या या कार्याची परिसरात सर्वत्र प्रशंसा होत आहे.














