वडसात होणार रेल्वे उड्डाणपूल; कुरखेडा-लाखांदूर मार्गावरील जड वाहतूक वळवली

3

वडसात होणार रेल्वे उड्डाणपूल; कुरखेडा-लाखांदूर मार्गावरील जड वाहतूक वळवली
– ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत निर्बंध; हलक्या व जड वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : वडसा-ब्रह्मपुरीदरम्यान रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी रोड ते कुरखेडा आणि ब्रह्मपुरी रोड ते लाखांदूर या दोन्ही मार्गांवरील जड वाहनांची वाहतूक ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या गोंदिया-चांदाफोर्ट विभागांतर्गत वडसा-ब्रह्मपुरीदरम्यान किलोमीटर ११०६/५-६ येथील मानवयुक्त रेल्वे क्रॉसिंग क्रमांक GCF-६० वर रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. या कामादरम्यान नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासह बांधकाम विनाअडथळा पूर्ण करण्यासाठी संबंधित मार्गांवरील जड वाहतूक बंद करण्याची विनंती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथील कार्यकारी अभियंत्यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.

हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग

वडसा रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या दुचाकी व हलक्या वाहनांनी विर्सी टी-पॉइंट, मुस्लिम कब्रस्तान, वडसा एलसी रेल्वे गेट आणि वडसा चुना भट्टी रोडमार्गे जावे. तर कुरखेडा व आरमोरीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी विर्सी टी-पॉइंट, लाखांदूर टी-पॉइंट, वडसा रेल्वे अंडरपास आणि कुरखेडा-आरमोरी रोड हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

कुरखेड्याकडे जाणाऱ्या जड वाहनांनी ब्रह्मपुरी रोड (वडसा) येथून आरमोरी बर्डी टी-पॉइंटमार्गे वडसा-कुरखेडा मार्गाचा वापर करावा. तर लाखांदूरकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठी ब्रह्मपुरी रोड (वडसा), विर्सी टी-पॉइंट आणि लाखांदूर रोड हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

वाहनधारकांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ११५ व ११६ तसेच प्रशासनाने जारी केलेल्या वाहतूकविषयक आदेशांचे काटेकोर पालन करावे. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक पोलिसांमार्फत प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या कालावधीत वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांनी निर्धारित पर्यायी मार्गांचाच वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here