चंद्रपूर : अस्वल-पिल्लाच्या मृत्यूने उघडले वाघाच्या शिकारीचे गुपित; घरातून नखे-सुळे जप्त
– दोन वर्षांपूर्वी विद्युत प्रवाह सोडून वाघाची शिकार केल्याची आरोपीची कबुली; २७ नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी
The गडविश्व
चंद्रपूर, दि. २५ : शेतातील विद्युत कुंपणामुळे अस्वल आणि तिच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा तपास करताना वनविभागाने दोन वर्षांपूर्वीच्या वाघाच्या शिकारीचा धक्कादायक उलगडा केला आहे. एकाच शेतात विद्युत प्रवाह सोडून वाघाची शिकार केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या प्रकरणी आरोपीच्या घरातून वाघाचे सहा नखे, दोन सुळे आणि एक हाड जप्त करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत चिमूर प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील चिमूर तालुक्यातील मौजा बोरगाव रोडी रिठ येथील सर्व्हे क्रमांक १० मधील शेतात २३ नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. गस्तीवर असलेल्या वनरक्षकाला शेतात अस्वल आणि तिचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. वनाधिकाऱ्यांनी पाहणी केली असता शेताभोवतीच्या तारेच्या कुंपणात सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून दोन्ही प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृत अस्वल मादीचे वय पाच ते सहा वर्षे, तर पिल्लाचे वय अवघे चार ते पाच महिने असल्याचा अंदाज आहे.
या घटनेच्या तपासादरम्यान फकीरा संभाजी रणदिवे (रा. तळोधी नाईक) याचे नाव समोर आले. त्याने यादव दौलत गोठे यांच्याकडून तीन वर्षांसाठी शेती ठेक्याने घेतली होती. शेतातील कुंपणात विद्युत प्रवाह सोडल्यामुळे अस्वल आणि तिच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची कबुली त्याने वनविभागाला दिली.
मात्र, चौकशीदरम्यान आरोपीने याच शेतात दोन वर्षांपूर्वी विद्युत प्रवाहाचा वापर करून वाघाची शिकार केल्याची माहिती दिली. शिकार केलेल्या वाघाचे अवशेष जमिनीत पुरून ठेवले होते. जुलै २०२६ मध्ये त्याने जमिनीतून वाघाचे सहा नखे, दोन सुळे आणि एक हाड बाहेर काढले. विक्री करण्याच्या उद्देशाने हे अवयव स्वतःच्या घरी नेल्याचेही त्याने सांगितले. वनविभागाने आरोपीच्या घरातून हे अवयव जप्त केले.
या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील कलम २ (१६), ९, ३९, ५० व ५१ अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला अटक करून चिमूर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वनकोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश आहे काय याचा पुढील तपास
वनविभागाचे अधिकारी करीत आहे .
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #chandrpurnews #crimenews #Chandrapur #TigerPoaching #WildlifeCrime #ForestDepartment #TheGadvishva













