आदिवासी युवक-युवतींसाठी ड्रोन पायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

1

आदिवासी युवक-युवतींसाठी ड्रोन पायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
– अमृत-टीआरटीआयमध्ये सामंजस्य करार; आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोजगारासह स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आदिवासी युवक-युवतींनाही कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र युवक-युवतींसाठी आता ‘अमृत ड्रोन मिशन’अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणाचे दालन खुले झाले असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर घडविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृतमार्फत यापूर्वी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लक्षित घटकांतील युवक-युवतींसाठी ‘अमृत ड्रोन मिशन’ राबविण्यात येत होते. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, जमीन सर्वेक्षण तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता या क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर या उपक्रमात भर देण्यात येत आहे. आता अमृत आणि टीआरटीआय यांच्यातील सामंजस्य करारामुळे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनाही या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये उमेदवारांना ड्रोन तंत्रज्ञानाचे सैद्धांतिक ज्ञान, प्रत्यक्ष उड्डाणाचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि आवश्यक व्यावसायिक कौशल्ये शिकविण्यात येणार आहेत. विशेषतः कृषी क्षेत्रातील कीटकनाशक फवारणी, पीक निरीक्षण, जमीन सर्वेक्षण, नकाशांकन आणि तांत्रिक सेवांमध्ये ड्रोनचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित ड्रोन पायलटसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.

नोकरीसोबत स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी

ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर युवक-युवतींना विविध क्षेत्रांत रोजगार मिळविण्यासोबतच स्वतःचा ड्रोन सेवा व्यवसाय सुरू करण्याचीही संधी उपलब्ध होऊ शकते. ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून उद्योजकतेकडे वळावे, तसेच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा

अनुसूचित जमाती प्रवर्गातील इच्छुक व पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा. प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असल्याने पात्र उमेदवारांनी विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने निलेश सागर यांनी केले आहे.
या प्रशिक्षणासंबंधी अधिक माहिती, पात्रता निकष आणि ऑनलाइन अर्जासाठी इच्छुकांनी www.amrutdronemission.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे अमृतच्या गडचिरोली जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here