देसाईगंजमध्ये २८ व २९ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय पारंपरिक वैदू साहित्य संमेलन

1

देसाईगंजमध्ये २८ व २९ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय पारंपरिक वैदू साहित्य संमेलन
– वैदू समाजाच्या लोकसंस्कृतीला मिळणार साहित्यिक व्यासपीठ
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : वैदू समाजाचा समृद्ध लोकवारसा, मौखिक साहित्य, पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने देसाईगंज येथे २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय पारंपरिक वैदू साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून आरोग्य प्रबोधिनी, आमगाव (बुटी) यांच्या वतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. लाखांदूर मार्गावरील कस्तुरबा वॉर्डातील हटवार मंगल कार्यालयात दोन दिवस साहित्य, संस्कृती आणि पारंपरिक ज्ञानाचा जागर रंगणार आहे.
शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ, सदस्य श्रीपाद अपराजित व जयू भाटकर, आमदार रामदास मसराम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पारंपरिक वैदू, वन्यजीव अभ्यासक तथा पत्रकार मिलिंद उमरे हे संमेलनाध्यक्ष, तर भाग्यवान खोब्रागडे हे स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी अन् वनौषधी प्रदर्शनाचे आकर्षण

संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ७.३० वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिर ते हटवार मंगल कार्यालय अशी ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. नगराध्यक्ष लता सौंदरकर यांच्या हस्ते दिंडीपूजन होईल. सकाळी ९ वाजता जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांच्या हस्ते वृक्ष व ग्रंथ प्रदर्शनासह वनौषधी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

लोककथा, मौखिक इतिहास आणि वनज्ञानावर मंथन

संमेलनाच्या पहिल्या दिवशी ‘वैदू समाजाचे लोकज्ञान : मौखिक परंपरेपासून लिखित साहित्यापर्यंत’ या विषयावर संमेलनाध्यक्षांचे भाषण होईल. त्यानंतर वैदू समाजातील लोककथा, दंतकथा व आख्यायिका, मौखिक इतिहासाचे संशोधन आणि दस्तऐवजीकरण, वनस्पती व निसर्गाशी संबंधित पारंपरिक वैदू ज्ञान तसेच वैदू परंपरा आणि साहित्यिक संदर्भ अशा विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत.
सायंकाळी वैदू बांधवांचे खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून, सांस्कृतिक कार्यक्रमांतून समाजाच्या लोककला आणि परंपरांचे दर्शन घडणार आहे. या चर्चासत्रातून वैदू समाजाच्या अनुभवांना आणि ज्ञानपरंपरेला अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळणार आहे.

जैवविविधता उद्यानाला भेट; ठरावांद्वारे समारोप

रविवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी जैवविविधता उद्यानाला भेट, साहित्य अभ्यास आणि विविध ठरावांचे सत्र होणार आहे. दुपारी १२ वाजता नियोजन समितीचे सदस्य किशन नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होईल. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, खासदार डॉ. नामदेव किरसान, विधान परिषद सदस्य अरुण लखाणी व अभिजित वंजारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वैदू समाजाच्या मौखिक ज्ञानपरंपरेचे संकलन, दस्तऐवजीकरण आणि पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या दृष्टीने हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. समाजाच्या लोकसाहित्याला व्यापक ओळख मिळवून देण्याबरोबरच संशोधक, साहित्यिक आणि अभ्यासकांना विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वैदू समाजबांधवांसह साहित्यिक, संशोधक, अभ्यासक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य प्रबोधिनीचे अध्यक्ष तथा संमेलनाचे आयोजक डॉ. सूर्यप्रकाश गभने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here