गडचिरोलीतील मुलींना आता वैमानिक होण्याची संधी; इंडिगोकडून मोफत निवासी प्रशिक्षण
-बारावी विज्ञान शाखेतील पात्र मुलींना मिळणार प्रशिक्षण; १ डिसेंबरला गडचिरोलीत मार्गदर्शन कार्यक्रम
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : जिल्ह्यातील मुलींनाही आता वैमानिक होण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने इंडिगो (IndiGo) आणि इंडिगोरीच (IndiGoReach) यांच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत मुलींसाठी १०० टक्के मोफत निवासी वैमानिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी १ डिसेंबर रोजी गडचिरोली येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील गुणवंत मुलींना विमान वाहतूक क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणासाठी बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) या विषयांसह किमान ५१ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. विशेष म्हणजे, प्रशिक्षण पूर्णतः मोफत आणि निवासी स्वरूपात दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणाची पात्रता, निवड प्रक्रिया आणि विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत मंगळवार, १ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता समाजकल्याण भवन, गडचिरोली येथे सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पात्र व इच्छुक मुलींनी या संधीची माहिती घेण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे आणि वैमानिक होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













