-राज्यात भाजप विरोधात रोष, काँग्रेस लढण्यास इच्छुक नाही पण तिसरा पर्याय नसणे लोकशाहीला घातक
The गडविश्व
गडचिरोली दि. ३१ : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने विदर्भात ५ उमेदवार दिले असून गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये बारीकराव मडावी हे पक्षाच्या वतीने रिंगणात आहेत. महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला असता २६ तारीख पर्यंत वाट पाहण्यात आली परंतु कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे पक्षाने राजकीय भूमिका म्हणून उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला.
भाजपच्या मागिल दहा वर्षात केलेल्या नकारात्मक कामामुळे महाराष्ट्रात प्रचंड विरोध आहे. तर दुसरीकडे काँग्रेस महाराष्ट्रात प्रभावीपणे निवडणुक लढवायला उत्सुक नाही, असे असताना तिसरा कोणताही पर्याय महाराष्ट्रातील मतदारांपुढे नाही ही लोकशाहीच्या मुल्यांची थट्टा आहे, भाजपच्या नितिविरोधात प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला आहे. याचा लाभ काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीला घेता येत नाही व त्याप्रकारचे राजकीय समन्वय ठेवण्यात काँग्रेस अपयशी झाली, हे दुर्दैव आहे. असे असले तरी भाजपला यावेळी देशात मोठा फटका बसणार असून याचा लाभ काँग्रेसेत्तर त्या त्या राज्यातील प्रभावी पक्षांना होईल असे दिसते. तसेच वंचित किंवा बसपा हा आमचा प्रतिस्पर्धी नसून आमचा थेट लढा भाजप काँग्रेस च्या निती विरोधात असल्याचे मत बहूजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केली.
ते गडचिरोली- चिमूर लोकसभा निवडणूकीत बीआरएसपी चे उमेदवार बारीकराव मडावी यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी गडचिरोली येथे आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी उमेदवार बारीकराव मडावी प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलींद बांबोळे यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. माने पूढे म्हणाले की २०२४ ची निवडणूक ही खऱ्या अर्थाने संवैधानिक लोकशाहीची दिशा ठरवणारी, सरकार कसे असावे आणि कसे नसावे हे ठरवणारी असणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत मारामाऱ्या सुरू असून प्रमुख नेते स्वतः लढण्याचे धारिष्ट्य न दाखवता मुलाबाळांना आणि नातेवाईकांना पूढे करीत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतः माघार घेत चंद्रपूर लोकसभेसाठी स्वतःच्या मुलीचे नाव पुढे केले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःच्या जागेवर पडोळेंना उमेदवारी दिली.
गडचिरोली चिमूर लोकसभेच्या दृष्टीने पेसा कायद्याचे उल्लंघन
वनहक्क कायद्याची हत्या, दावे प्रलंबित ठेवणे, ओबीसींची जणगणना, जिल्ह्यातील 638 सरकारी शाळा वाचविणे, शिक्षण, आरोग्य, आदिवासींची डिलीस्टींग, अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण, ओबीसींचे चार तुकडे पाडण्याचे भाजपचे षडयंत्र, जल -जंगल – जमीन आणि खदान विरोधी लढा असे प्रमुख मुद्याना घेऊन बिआरएसपी मैदानात राहिल असेही सांगण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #loksabhaelection2024 #gadchirolichimur #brsp )