गावाला दारूविक्रीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु

119

-एका दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : चामोर्शी तालुक्यातील तळोधी मो या गावातून अवैध दारू हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली गाव संघटनेने दारूबंदीचा निर्णय घेत अहिंसक कृती केली. यामध्ये एका दारूविक्रेत्यास पोलिस विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
तळोधी या गावात पूर्वीपासूनच अवैध दारूविक्री सुरु आहे. या गावात दारूबंदीसाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने दारू विक्रेत्यांच्या संख्येत वाढ होत होती. अशातच मुक्तिपथ तर्फे महिला ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत ग्रापं सदस्य विनोद सातपुते, विद्या मेश्राम, माजी पोलिस पाटील कोठारे उपस्थित होते. या सभेत दारूबंदीबाबत योग्य उपाय योजना व दारूबंदी कशी होऊ शकते, दारूमुळे महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर कसे आळा घालता येईल. यासाठी दारूविक्री विरोधात महिलांना पुढे येणे गरजेचे आहे, ही बाब मुक्तिपथचे तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी पटवून दिले.
सभेत मुक्तिपथ गाव संघटना स्थापन करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी रेखा कुनघाडकर, सचिव ललिता मेश्राम यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर दारूबंदीचा ठराव पारित करून दारू विक्रेत्यांची यादी तयार करण्यात आली. मुजोरीने दारूविक्री करताना आढळून आल्यास पहिला दंड १० हजार, दुसरा दंड २० व तिसरा दंड ५० हजार रुपये व कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव पारित करण्यात आला. दरम्यान, निर्णयाची अंमलबजावणी करीत गाव संघटनेच्या माध्यमातून अहिंसक कृती करण्यात आली. यावेळी दामोदर गडपल्लीवार या विक्रेत्याकडे दारू आढळून आली. त्याच्यावर पोलिस कारवाई करण्यात आली. तसेच इतर दारू विक्रेत्यांकडून हमीपत्र लिहून घेत पुन्हा अवैध व्यवसाय न करण्याचे आवाहन करण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here