उद्या गडचिरोलीत ‘नो-व्हेईकल झोन’ : मुख्य मार्गांवर सायंकाळी ४ नंतर वाहतूक बंद
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गडचिरोली शहरात मोठ्या उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, मुख्य इंदिरा गांधी चौक परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या आदेशानुसार गडचिरोली–आरमोरी, चंद्रपूर, धानोरा आणि चामोर्शी या प्रमुख मार्गांवरील दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. विशेषतः अवजड व हलक्या वाहनांना या कालावधीत शहरात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ व ११६ अंतर्गत अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. तथापि, रुग्णवाहिका, प्रवासी बसेस तसेच पाणीपुरवठा, महावितरण, दूरसंचार व रस्ते दुरुस्तीशी संबंधित अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर भारतीय दंड संहिता १८६० व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जयंती उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असेही सांगण्यात आले आहे.














